
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. मात्र, राज्यातील राजकीय अस्थिरता कायम असून, यावरून शिवसेनेनं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करणाऱ्या आमदारांसह बंडखोरांसह भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही सेनेनं केला आहे.
शिवसेनेनं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे की, "भाजपची अलीकडच्या काळातील वक्तव्ये जनतेला गोंधळात टाकणारी आहेत. एका बाजूला चंद्रकांत पाटलांनी सांगायचे, शिवसेनेत जे सुरू आहे त्याच्याशी आपला संबंध नाही. तो त्यांचा अंतर्गत मामला आहे. त्याच वेळी रावसाहेब दानवे यांनी अंगास हळद लावून व मुंडावळय़ा बांधून बोलायचे, ‘आता फार तर एक-दोन दिवसच विरोधी पक्षात बसू. दोन-तीन दिवसांत राज्यात भाजपचे सरकार येईल.’ शिवसेनेतील बंडाशी संबंध नाही असे म्हणायचे व दुसऱ्या बाजूला दोन दिवसांत भाजपचे सरकार येईल, असे बोलायचे. त्यामुळे खरे काय?," असा सवाल उपस्थित केला आहे.
"मुंबईतील बंडखोरांच्या मुखपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. अमित शहांनी म्हणे बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मधुर संवाद साधला आहे. या संवादात म्हणे शहा यांनी बंडखोरांच्या अपात्रतेविषयी चर्चा केली. बंडखोर आमदारांवर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन श्री. शहा यांनी दिले असे प्रसिद्ध झाले. अमित शहा यांच्याशी संवाद पार पडल्यावर बंडखोर आमदारांत उत्साह संचारला. या उत्साहात भर पडावी म्हणून गृहमंत्री शहा यांनी बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा पुरवली," असं सेनेनं म्हटलं आहे.
"जनामनाची लाज असती तर मंत्रीपदाचे राजीनामे देऊन ते राज्याबाहेर गेले असते, पण शिवसेनेने दिलेली मंत्रीपदे कायम ठेवून ते तत्त्वाची भाषा करीत आहेत. आम्ही म्हणे महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या हितासाठी भाजपबरोबर जात आहोत, पण काय हो मंडळी, महाराष्ट्रावर ‘फुटी’चे व ‘तुटी’चे संकट भाजपमुळे येऊ घातले आहे त्यावर गुवाहाटीमधील तुमचे दलबदलू प्रवक्ते अद्यापि तोंड का उचकटत नाहीत?" असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
"महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची मोठी खतरनाक योजना भाजपमधील दिल्लीतील नेत्यांनी योजली आहे. महाराष्ट्राचे सरळ तीन तुकडे करायचे, मुंबईला वेगळे करायचे व छत्रपती शिवरायांचा हा अखंड महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा, असा हा डाव असल्याचे भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनीच उघड केले. यावर प्रखर हिंदुत्ववादी, महाराष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्यांचे काय सांगणे आहे?," असा टोला बंडखोरांना लगावला आहे.
"जो भाजप सतत महाराष्ट्रावर हल्ले करीत आहे, त्याच भाजपच्या नेत्यांकडून हे लोक मार्गदर्शन घेऊन उत्साहाची ऊर्जा निर्माण करीत आहेत. महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे उद्योग नक्की कोण करीत आहे? हे डाव आता उघड झाले असूनही ही मंडळी त्यांच्याच नावाचा गजर करीत आहेत. पुन्हा सरकार व शिवसेनेच्या बाजूने जे उभे आहेत, त्यांच्यावर ‘ईडी’चे फास आवळून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरूच आहे. हे सर्व खेळ महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणखी किती काळ चालणार?," असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
"छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मनिष्ठेचे व स्वराज्य प्रेमाचे दाखले आपण देतो, ते स्वराज्य प्रेम आज कोठे गेले? बात स्वाभिमानाची आणि हिंदुत्वाची करायची आणि हे असले भलतेच उद्योग करून महाराष्ट्रद्रोह्यांचे हात बळकट करायचे. ‘महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करू,’ असं शिवसेनेपैकी कोणी बोलले तर ‘यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे हो ,’ म्हणून बोभाटा करायचा."
"भाजपशी जे पाट लावू इच्छित आहेत त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच. दानवे म्हणतात त्याप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवसांत त्यांचे सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत, पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय?," असं शिवसेनेनं म्हटलं आहे.