'३८ आमदारांनी पाठिंबा काढला, ठाकरे सरकार अल्पमतात'; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधीच खळबळ

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह गेलेल्या बंडखोर आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचं जाहीर केलं आहे
Maharashtra Political Crisis shivsena 38 Rebel MLAs Withdraw support of Mahavikas Aghadi Government
Maharashtra Political Crisis shivsena 38 Rebel MLAs Withdraw support of Mahavikas Aghadi Government

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे खळबळ माजली आहे. एवढंच नाही तर शिवसेना हा पक्षही फुटला आहे. अशात ही लढाई सुप्रीम कोर्टात गेली आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होण्याच्या आधीच महाविकास आघाडी सरकारला (Maha vikas Aghadi) धक्का बसला आहे. शिवसेनेच्या (Shivsena) ३९ आमदारांनी आम्ही सरकारचा पाठिंबा काढला आहे हे जाहीर केलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे.

बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल केली आहे त्या याचिकेत सरकारचा पाठिंबा काढला असल्याचा दावा करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षांचा दुरूपयोग सुरू असल्याचा दावाही बंडखोर आमदारांनी केला आहे. महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाचा खेळ सुप्रीम कोर्टात पोहचला आहे तिथे सुनावणीला सुरूवात होण्याआधीच ही बातमी समोर आली आहे.

शिवसेनेने १६ आमदारांना अपात्र ठरवत त्यासंदर्भातल्या कारवाईचं पत्र विधानसभा उपाध्यक्षांना दिलं आहे. तर या कारवाईच्या विरोधात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती द्यावी ही मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसंच अजय चौधरी यांच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याचीही याचिका दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे, या सगळ्या लढाईचा शेवट सरकार पडण्यात होणार आहे हे दिसतं आहेत. सुप्रीम कोर्टातली सुनावणी सुरू होण्याआधीच शिंदे गटाने सरकारचा पाठिंबा काढल्याचं जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकारने जनहिताची कामं अडून राहू नयेत यासाठी बंडखोर मंत्री तसंच राज्यमंत्री यांच्याकडच्या खात्यांचं फेरवाटप केलंय. यात एकनाथ शिंदेंकडे असलेलं नगरविकास खातं हे सुभाष देसाईंना देण्यात आलं आहे. सत्ता संघर्षाचा हा सामना थेट उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे असा आहे. त्यात चाली प्रतिचाली आणि डाव प्रतिडाव दिसत आहेत.

महाराष्ट्रात शिवसेनेत घडलेल्या या अभूतपूर्व बंडामुळे राजकीय भूकंप निर्माण झाला आहे. सत्तेच्या महाभारताचा हा सातवा दिवस आहे. या सात दिवसात अनेक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपली शिवसेना हीच मूळ शिवसेना असल्याचं आणि आपण सगळे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारे असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी भाजपने आपल्याला कसा दगा दिला आणि जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आपले शत्रू होते ते आपल्यासोबत कसे हे सांगत शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे. त्यानंतर हा पेच सुप्रीम कोर्टात पोहचलाय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in