'...तर नक्कीच एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असते'; राजकीय गदारोळात संजय राऊतांचं मोठं विधान

'आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या हातात काहीच राहिलेलं नाही'; मुलाखतीत संजय राऊतांचं महत्त्वाचं भाष्य
'...तर नक्कीच एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असते'; राजकीय गदारोळात संजय राऊतांचं मोठं विधान
shivsena eknath shinde revolt, big political news in maharashtra

शिवसेनेते एकनाथ शिंदेंसह निम्याहून अधिक आमदारांनी केलेल्या बंडाने राज्यातील सरकारवर अस्थिरतेचे ढग दाटले आहेत. सरकारचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होत असताना, महाविकास आघाडीतील नेते सरकार टिकणार असा दावा करत आहेत. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी 'आजतक'ला मुलाखत दिली. यात त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडण्याबरोबरच मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

एकनाथ शिंदे मुंबई आल्यानंतर त्यांची भेट घेणार का? असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, "एकनाथ शिंदे कुठे आहेत, हा प्रश्नच आहे. त्यांना मुंबईत यावं लागेल. ते येथून निवडून गेले आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहे. त्यांना इथे यावं लागेल. त्यांना आमच्यासमोर यावं लागेल. ते शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांना यावं लागेल आम्ही तर त्यांची वाट पाहत आहोत. इथे-तिथे ठोकरा खात फिरू नका."

पुढे बोलताना राऊत म्हणाले, "आधी सुरतला गेले. नंतर गुवाहाटीला गेले. आता मी ऐकतोय की ते गुवाहाटीवर ते गोव्याला जाणार आहेत, असं मी ऐकतोय. हे सगळं करण्याची गरजच काय आहे. तुमच्या मनात जे काही आहे, ते इथे उद्धव ठाकरेंच्या समोर येऊन सांगू शकत होते. पण त्यासाठी त्यांना भाजपची सुरक्षा आणि मदत घ्यावी लागली. आत्मसन्मान असलेला हे शिवसैनिक नाहीत."

एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहात का?, असं राऊत यांना विचारण्यात आलं. ते म्हणाले, "माझं आणि त्यांचं दररोज बोलणं होत आहे. त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांसोबतही माझं बोलणं सुरू आहे. ते आमचे शत्रू नाहीत. आम्ही वर्षानुवर्षे काम केलंय. आमच्या फक्त पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नातं नाही, तर आमच्यात रक्ताचं नातं आहे."

एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीवर राऊत म्हणाले, "एकनाथ शिंदेंच्या हातात आता काहीच राहिलेलं नाही. त्यांचा कब्जा भाजपने घेऊन टाकला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी काय करायचं. त्यांनी काय जेवायचं, कधी झोपायचं, उठायचं आहे की, बसायचं आहे, हे सगळं भाजप ठरवणार आहे. आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या हातात काहीच राहिलेलं नाही," असं राऊत म्हणाले

"आमचे विधानसभेतील ५५ सदस्य आहेत. आता मी असं मानतो की ते सगळे आमदार गेले आहेत. आमदार जाण्याचा अर्थ पक्ष संपला असा होत नाही. पक्ष पुन्हा उभा राहतो. पुन्हा आमदार निवडून येतात. दोन वेळा बंडखोरी झालीये. नारायण राणेंनी बंडखोरी केली. छगन भुजबळ यांनी बंडखोरी केली. त्यांच्यासोबतही आमदार गेले होते. पण त्यापैकी एकही आमदार पुन्हा निवडून आला नाही. तसंच यावेळीही जे आमदार एकनाथ शिंदेंसोबत राहतील, समजून जा त्यांची राजकीय कारकीर्द संपली. महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतली आहे. त्यांच्या घरांवर, कार्यालयांवर लोकांनी मोर्चे काढले आहेत. हे तर पहिलं पाऊल आहे. पुढे काय होतं, ते बघा," असा इशारा राऊतांनी दिला.

शरद पवारांसोबत झालेल्या भेटीबद्दल राऊत म्हणाले, "रणनीतीचीचा प्रश्न नाहीये. जिथे कुठे आमदार लपवून ठेवले आहेत. त्यांची येण्याची वाट बघत आहोत. शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारची प्रेरणा राहिले आहेत. आजही आम्ही सगळे लोक मग त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो वा शिवसेना लढण्याच्या तयारीत आहोत. सभागृहातही लढू आणि रस्त्यावरही लढा देऊ. प्रत्येक टप्प्यावर लढू."

"कायदेशीर लढा सुरूच राहिल. जिथे भाजपचं राज्य नाही, तिथे भाजप सरकारे पाडून स्वतःची सरकारं स्थापन करत आहे. हे देशासमोर मोठं आव्हान आहे. मी सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील स्थितीवरून संपूर्ण विरोधक एकजूट झालेत. संपूर्ण देशातून आम्हाला समर्थन मिळत आहे. भाजपने हा जो खेळ सुरू केलाय. ही जी आग लावलीये. या आगीत तेच जळणार आहेत," असा इशारा राऊतांनी भाजपला दिला.

अशी काय गडबड झाली की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यास इतके आमदार तयार झाले, असा प्रश्न राऊत यांना विचारला असता, संजय राऊत म्हणाले, "हा प्रश्न तुम्ही ईडीला विचारा. ज्याप्रकारे ईडीने हे सरकार पाडण्यात आणि नवीन सरकार बनवण्यासाठी रस घेतलाय. त्यामुळे मीच केंद्रीय यंत्रणांना विचारेल की तुम्ही इतका रस का घेतला. आमचे १७ आमदार आहेत, ज्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाली. त्यांना धमकावण्यात आलं. मुंबईतून एका ईडीच्या अधिकाऱ्याने १७ आमदारांना भाजपच्या नेत्याच्या ताब्यात दिलं. विरोधकांचा आवाज जर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दाबत असाल, तर तो दबणार नाही. तुरुंगात टाका किंवा फाशी द्या, तो दबणार नाही."

"आमचे आमदार दबावाखाली आहेत. सीबीआय, ईडी, आयकर विभाग. ज्यांच्यावर भाजप वर्षांपासून आरोप करत होती. त्यांना ईडीने एका तासात क्लिअर केलं. एकनाथ शिंदे यांच्याभोवतीही ईडीचा फास आवळला जात होता. हे आधी धमकावतात. घाबरवतात. तुरुंगात टाकण्यासाठी षडयंत्र रचतात. काही लोक घाबरतात काही लोक घाबरत नाही. या देशाची लोकशाही खूप मजबूत आहे. लढणारे लढतच राहतील," असं राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचं वचन दिलं होतं का?, प्रश्नावर राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी तयार नव्हते. आम्ही सगळ्यांनी त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी तयार केलं. तीन पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे त्यांना सरकारचं नेतृत्व करण्यासाठी तयार केलं. ते स्वतःहून मुख्यमंत्री बनले नाहीत."

पुन्हा त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला, त्यावर राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली. "मी स्पष्ट करू इच्छितो की, भाजप त्यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित असेल, तर बनवावं. बनवू शकतात का? जर तुम्ही तिथे मुख्यमंत्री होऊ शकत नसाल, तर तुम्हाला इथे काय कमी आहे. कॅबिनेटमध्ये तुम्हाला दुसऱ्या नंबरचं स्थान देण्यात आलंय. जर भाजप-शिवसेना युतीचं राज्य आलं असतं. भाजपने अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री वाटून घेतलं असतं, तर नक्कीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. त्यामुळे त्यांना भाजपनेच मुख्यमंत्री बनू दिलेलं नाही," असं राऊत यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in