मालेगाव महापालिका आयुक्तांवर गटारीचं पाणी, चहा ओतला; MIM आमदारांच्या आंदोलनातील प्रकार

आंदोलकांनी आयुक्तांना धक्काबुक्कीही केल्याची माहिती
Malegaon Municipal Commissioner
Malegaon Municipal CommissionerMumbai Tak

मालेगाव : शहर महापालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या अंगावर गटाराचं पाणी आणि चहा फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एमआयएमचे मालेगाव मध्यचे आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी आयुक्तांना धक्काबुक्कीही केल्याची माहिती आहे. यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण झालं होतं.

मालेगाव शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. मनपाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे, अनेकदा पाठपुरावा करूनही मनपातील मागील सत्ताधारी आणि अधिकारी यांनी एकत्रित येत रस्त्यांची कामे रोखली, असे आरोप करत एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल यांनी मालेगाव-आग्रा रोडवर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

आग्रा महामार्गावर रोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. याशिवाय शहरात येणारे इतर प्रमुख रस्तेही मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने खड्यामुळे रोज अपघात होतात. यात काहींचा मृत्यूही झाला आहे, असे सांगत महापालिका प्रशासनाकडून जोपर्यंत रस्ते दुरुस्ती केली जात नाही तोपर्यंत रस्त्यावरच आंदोलन करणार असा पवित्रा आमदार मुफ्ती इस्माईल यांनी घेतला.

हे आंदोलन सुरू असतानाच महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी आंदोलनस्थळी चर्चेसाठी आले. मात्र त्यावेळी आंदोलन अधिकच तापले, आयुक्तांवर आंदोलकांनी गटारीचे पाणी आणि गरम चहा टाकला, तसंच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आल्याची माहिती आहे. आंदोलनावेळी मनपा आयुक्त यांच्या गाडीसमोर आंदोलक अक्षरशः चाकाखाली लोळले. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं आमदार मुफ्ती यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in