नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी बोलावलेली विरोधी पक्षनेत्यांची बैठक दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये पार पडली. आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी समान उमेदवाराचा विचार करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची संयुक्त बैठक बोलावली होती. यादरम्यान देशातील विरोधी पक्षनेत्यांनी आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वांचा एकच उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की आज बैठकीला अनेक पक्ष होते. या बैठकीत आम्ही एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे . त्या उमेदवाराला सर्वांचा पाठिंबा राहील. आम्ही इतरांशी सल्लामसलत करू. ही चांगली सुरुवात आहे. आम्ही अनेक महिन्यांनी एकत्र बसलो आणि आम्ही पुन्हा चर्चेला बसू. यासोबतच आगामी राष्ट्रपती निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांचा एकच उमेदवार असेल असा ठराव विरोधी पक्षनेत्यांनी मंजूर केल्याचे सुधींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी उमेदवार म्हणून फारुख अब्दुल्ला आणि गोपालकृष्ण गांधी यांची नावे सुचवली असल्याचे आरएसपीच्या प्रेमचंद यांनी सांगितले.
Opposition leaders adopt a resolution to field a common candidate in the forthcoming Presidential election pic.twitter.com/XgCUFMzEIW
— ANI (@ANI) June 15, 2022
Opposition leaders adopted a resolution to field a common candidate in the forthcoming Presidential poll. A candidate who can truly serve as custodian of the Constitution & stop Modi govt from doing further damage to Indian democracy and India's social fabric: Sudheendra Kulkarni pic.twitter.com/rzDPAAAo3I
— ANI (@ANI) June 15, 2022
एक असा उमेदवार, जो प्रत्यक्षात संविधानाचा संरक्षक म्हणून काम करू शकतो आणि मोदी सरकारला भारतीय लोकशाही आणि भारताच्या सामाजिक बांधणीचे आणखी नुकसान होण्यापासून रोखू शकतो असा उमेदवार असा असेही कुलकर्णी म्हणाले. ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात २२ विरोधी नेत्यांना आणि बिगर-भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून १५ जूनच्या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली होती.
बैठकीला टीआरएस आणि आम आदमी पक्षाची बगल
आजच्या बैठकीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेस नेत्यांसह डावे पक्षही सहभागी झाले होते. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीत अनेक पक्ष सहभागी झाले नाहीत. यातील सर्वात प्रमुख म्हणजे तेलंगणा राष्ट्र समिती (TRS), ज्याचे नेतृत्व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव करतात. यासोबतच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाही या बैठकीपासून दुर राहिला.
शरद पवारांनी फेटाळली राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची अटकळ
आजच्या बैठकीपूर्वी बॅनर्जी यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पवार यांच्या पक्षाने ते राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असण्याची शक्यता खोडून काढली आणि काही विरोधी पक्षांनी संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाला पाठिंबा दिला असतानाही ते निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले.
2024 च्या निवडणुकीत शरद पवारांना राहायचंय व्यस्त
एनसीपीच्या एका मंत्र्याचा हवाला देत पीटीआय या वृत्तसंस्थेने सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष स्वत:ला राष्ट्रपती भवनापुरते मर्यादित ठेवू इच्छित नाहीत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात ते व्यस्त असणार आहेत.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी
देशातील सर्वोच्च घटनात्मक पदासाठी 18 जुलै रोजी निवडणूक होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. खासदार आणि आमदार असलेल्या इलेक्टोरल कॉलेजचे ४,८०९ सदस्य रामनाथ कोविंद यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी सज्ज असणार आहेत.