'भाजप सोडून अनेक जण माझ्यासोबत येण्यास तयार', उमेदवारी मिळताच एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपमध्ये जे राजकारण सुरु आहे त्यामुळे अनेक जण नाराज असून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
'भाजप सोडून अनेक जण माझ्यासोबत येण्यास तयार', उमेदवारी मिळताच एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
many people are ready to leave bjp and come with me eknath khadse claim criticized to devendra fadnavis

मुंबई: 'ज्यांनी पक्ष उभा केला ते पक्षाच्या बाहेर आहेत. ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाहीए ते पक्षाच्या आत आहे. असं सध्या सुरु आहे. मला वाटतं यामुळेच अनेकजण नाराज आहेत. त्या नाराजांची माझ्यासोबत चर्चाही झाली आहे. अनेक जण पक्ष सोडून माझ्यासोबत येण्यास तयारही आहेत.' असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर खडसे यांनी माध्यमांशी बोलताना अगदी थेटपणे देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

'देवेंद्र फडणवीस आल्यानंतर भाजपमध्ये एक वेगळं राजकारण सुरु झालं आहे आणि त्या राजकारणाचे परिणाम आम्ही सगळे भोगतोय.' असा आरोपच यावेळी एकनाथ खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?

'विधानसभेला माझं तिकीट नाकारुन या ठिकाणी नाथाभाऊ राजकीय विजनवासात जाईल अशा स्वरुपाची व्यवस्था झाली. परंतु अशा अडचणीच्या कालखंडात माननीय शरद पवार, प्रफुल पटेल, अजितदादा, जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन मला या ठिकाणी विधानपरिषदेसाठी संधी दिली आहे. मला वाटतं या संधीचं सोनं मी करेन. जो विश्वास NCP ने माझ्यावर दाखवला तो मी सार्थ ठरवेन.' असं म्हणत एकनाथ खडसेंनी शरद पवार यांचे आभार मानले आहेत.

'40 वर्ष मी भाजपचं काम केलं. खूप मेहनतीने मुंडे साहेब, महाजन साहेब यांनी भारतीय जनता पक्षाचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य भाजपसाठी दिलं. त्यानंतरही भाजप माझ्याशी अशा पद्धतीने वागली. की, सुरुवातीला माझ्यावर आरोप लावले, चौकशी लावली आणि आता एवढ्या जोरात चौकशी सुरु होती की, माझं घर खाली करण्याची देखील नोटीस देण्यात आली होती.' अशी खदखद यावेळी एकनाथ खडसेंनी व्यक्त केली.

'माझ्या सर्व अकाउंटमधील पैसे सीज करुन पैसे काढून घेतले. एक रुपयाही माझ्या अकाउंटमध्ये ठेवले नाही. एवढं सगळं झाल्यानंतर मी पक्षात राहणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी NCP मध्ये प्रवेश केला. NCP मध्ये आल्यानंतर आज मला न्याय मिळालाय असं मला वाटतं.' असंही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.

'पंकजा मुंडेंबाबत मला खरंच दु:ख वाटतंय'

'भाजपचा पंकजा मुंडेंबाबत जो निर्णय आहे त्याबाबत मला खरंच दु:ख वाटतं. ज्या लोकांनी पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये मुंडे-महाजन हे होते त्यांच्याच नेतृत्वात पक्ष मोठा झाला. पंकजा मुंडे या एक ओबीसी चेहरा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची तशी ओळख आहे. पक्षाला त्याचा फायदाही होतोय. अशावेळी त्यांचा उपयोग फक्त प्रचारासाठी करुन घेणं हे योग्य नाहीए. खरं तर हा भाजपचा प्रश्न आहे मी त्यावर फार काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. पण मुंडे कुटुंबीयांशी माझे नेहमीच जवळचे संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे मला अधिक दु:ख वाटतं.' अशा भावना यावेळी एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंना उमेदवारी न देण्यावरुन व्यक्त केल्या आहेत.

many people are ready to leave bjp and come with me eknath khadse claim criticized to devendra fadnavis
राष्ट्रवादीेने पत्ते उघडले; निंबाळकर, खडसेंची विधान परिषदेसाठी वर्णी

'मुंडे-महाजन ग्रुपमधील लोकांना बाजूला सारण्याचा प्रयत्न'

'एक गोष्ट नक्की आहे की, जे मुंडे-महाजन ग्रुपमधील लोकं आहेत मग ते विनोद तावडे असो किंवा खडसे असो नाहीतर फुंडकर किंवा पंकजा मुंडे असतील या सगळ्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न आताही सुरु आहे. ज्यांनी पक्ष उभा केलाय ते पक्षाच्या बाहेर आहेत. ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाहीए ते पक्षाच्या आत आहे. असं सध्या सुरु आहे. मला वाटतं यामुळेच अनेकजण नाराज आहेत. त्या नाराजांची माझ्यासोबत चर्चाही झाली आहे. अनेक जण पक्ष सोडून माझ्यासोबत येण्यास तयारही आहेत.' असा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी यावेळी केला आहे.

'फडणवीसांमुळे आम्हाला भोगावं लागतंय'

'माझं असं स्पष्ट मत आहे की, या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आल्यानंतर भाजपमध्ये एक वेगळं राजकारण सुरु झालं आहे आणि त्या राजकारणाचे परिणाम आम्ही सगळे भोगतोय.' असा थेट आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

दरम्यान, आता एकनाथ खडसे यांच्या या आरोपांना देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in