MCD : ५ मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळ, आमदार, खासदार आले... पण 'केजरीवाल' पुरुन उरले

अमित शाह अन् योगी आदित्यनाथ मैदानात उतरलेच नाहीत...
Delhi MCD
Delhi MCDMumbai tak

दिल्ली : देशभराचं लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत २५० जागांपैकी आम आदमी पक्षाने तब्बल १३४ जागांवर विजय नोंदविला. तर दुसऱ्या क्रमांकावरील भाजपला १०४ जागा जिंकण्यात यश आलं आहे.  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात लढलेल्या या निवडणुकीत आम आदमी पक्षाने तब्बल १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला पराभवाची चव चाखायला लावली आहे.

भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती :

ही निवडणूक अधिकाधिक बहुमताने जिंकण्यासाठी आणि सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती. त्यामुळे दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत असं दृश्य कदाचित यापूर्वी कधीच बघायला मिळालं नव्हतं. भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, दोन डझन केंद्रीय मंत्री आणि अनेक आमदार, खासदार यांच्याकडे पक्षाने प्रचाराची धुरा सोपवली होती

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उतरले होते या निवडणुकीच्या मैदानात ठाण मांडून होते.

तर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, पीयूष गोयल, हरदीप पुरी, अनुराग ठाकूर यांनी रोड शो केला होता. पियुष गोयल यांनी हनुमान चालिसाचेही पठण केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनीही दिल्लीत प्रचार केला होता. पूर्वांचल भागाला आकर्षित करण्यासाठी भाजपने मनोज तिवारी, दिनेश लाल यादव, निरहुआ आणि रवी किशन या खासदारांना प्रचारात उतरवलं होतं.

हे नेते प्रचाराकडे फिरकलेच नाहीत...

भाजपने निवडणूक प्रचारासाठी राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, खासदार हेमा मालिनी यांच्या नावाचाही समावेश होता. पण, हे स्टार प्रचारक प्रत्यक्षात रिंगणात उतरलेच नाहीत. गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील पोट निवडणुकांतील व्यस्ततेमुळे अमित शाह आणि योगी आदित्यनाथ प्रचारासाठी दिल्लीत आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in