Gulabrao Patil: अजित पवारांनीही पहाटे शपथ घेतली होती मग त्यांनाही गद्दार म्हणायचं का?

जाणून घ्या गुलाबराव पाटील यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Gulabrao Patil Asks Question to Ajit pawar
Gulabrao Patil Asks Question to Ajit pawar

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जळगावत झालेल्या मेळाव्यात शिंदे सरकार आणि त्यांच्या आमदारांवर जोरदार टीका केली. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे सकाळी ६ पर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी? असा प्रश्न विचारला होता. तसंच ५० खोके एकदम ओकेचाही उच्चार केला. याबाबत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रश्न विचारत प्रत्युत्तर दिलं.

गुलाबराव पाटील अजित पवारांच्या टीकेबाबत काय म्हणाले?

अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. टीका करणं हे त्यांचं काम आहे. पण अजित पवार यांनीही पहाटेचा शपथविधी केला होता. मग आम्ही त्यांना गद्दार म्हणायचं का? असा प्रश्न गुलाबराव पाटील यांनी विचारला. जळगावमधल्या एका कार्यक्रमात त्यांनी हा प्रश्न विचारत गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांना उत्तर दिलं आहे.

आमच्या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली

आमच्या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली, साडेतीनशे कोटी जळगाव जिल्ह्यासाठी मिळाले ही गोष्ट अमान्य करून कशी चालेल? आम्हाला गद्दार म्हटलं जातं आहे..अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत. सरकारच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी त्यांनी सांगितल्या पाहिजेत. मात्र त्यांच्या जळगावमधल्या भाषणात फक्त सरकारवर टीकाच होती. सरकारच्या चांगल्या कामांवर अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात काहीही प्रकाश टाकला नाही. असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

माझ्याविरोधात दोन गुलाबराव फिरत आहेत

माझ्याविरोधात दोन गुलाबराव फिरत आहे, दोन्ही आतापासून आमदार झालेले आहेत. त्यांनी आता ठरवावं की त्यांचा करा नवरदेव कोण? त्यांचं त्यांच्यामध्येच काही ठरत नाही. राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि शिवसेनेचे गुलाबराव वाघ या दोघांनाही गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

अजित पवार म्हणाले, 'एक दोन दिवस माणूस 24 तास काम करू शकेल किंवा सूरतला गेल्यावर आता पद मिळणार म्हणून जागू शकेल. पण, नंतर कधीतरी तो मेंदू म्हणेल अरे झोप झोप. ६ तास तर झोप पाहिजेच ना राव. आम्ही साहेबांचंही काम बघितलंय ५५ वर्षे. सकाळी ते २ वाजता झोपले तरी ते सकाळी ७ वाजता तयार असायचे. पण, पाच-सहा तास झोप घ्यायचेच ना. पटेल असं बोला राव. लईच पुढचं बोलायला लागले.'

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, 'तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. आम्हा सगळ्यांचे मुख्यमंत्री आहात. तुमच्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे. पण, तु्म्ही काहीही पटण्या न सारखं बोलले तर आम्हाला बोलावं लागेल. नाईलाज नाही. महागाई, बेरोजगारीबद्दल काही बोलत नाही. दुसऱ्याच मुद्दा काढतात', अशी टीका अजित पवारांनी केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in