'या विषयाचा तुकडा पाडूनच टाकूया', राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला पत्र; मनसैनिकांना नवा आदेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विषयावरुन आता राज्यातील जनतेलाच एक पत्र लिहलं आहे. पाहा या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे.
'या विषयाचा तुकडा पाडूनच टाकूया', राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला पत्र; मनसैनिकांना नवा आदेश
mns chief raj thackeray letter to the people of maharashtra regarding masjid loudspeaker(फाइल फोटो)

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यापासून मशिदीवरील भोंग्याचा विषय अत्यंत आक्रमकपणे हाती घेतला आहे. त्यानंतर झालेल्या प्रत्येक सभेत राज ठाकरेंनी हा विषय लावून धरला होता. आता राज ठाकरे यांनी याचविषयी महाराष्ट्रातील जनतेला एक पत्र लिहलं आहे. ज्यामध्ये या विषयाचा एकदाचा तुकडा पाडून टाकण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोग्यांबाबतच्या विषयावर सविस्तर पत्र लिहलं असून ते राज्यात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचलं पाहिजे असे आदेश देखील मनसैनिकांना दिले आहेत. लोकांच्या घरोघरी जाऊन हे पत्र वाटप करावेत असंही राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

पाहा राज ठाकरेंच्या 'त्या' पत्रात नेमकं काय म्हटलं आहे:

मशिदींवरील भोंगे काढण्यात यावेत ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती आणि भोंगे उतरवण्यासाठी चार मेचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच मशिदींवरीचे भोंगे उतरले, पहाटेच्या अजान बंद झाल्या, दिवसभरातल्या बांगा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या नियमांनुसार कमी आवाजात होऊ लागल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील 92% मशिदींमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर हा परिणाम दिसून आला.

भोंगे उतरवा ही मागणी काही नवीन नव्हे. स्वातंत्र्योत्तर काळात अनेकांनी ही मागणी केली, परंतु त्यावर कुणालाही उत्तर सापडले नाही. अनेकजण न्यायालयांत गेले. त्यावर काही उच्च न्यायालयांनी भोंग्यांविरोधात कारवाई करा असं सांगितलं. तर सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या त्रासाची दखल घेत डेसिबलची मर्यादा घातली. तरीही देशभरात भोंग्यांचा धुमाकूळ सुरुच होता. अखेर, 'लाऊडस्पीकरवरची तुमची अजान, बांग थांबली नाही तर आम्ही लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू' असं आम्ही ठणकावून सांगितल्यानंतर चित्र बदललं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आमचा हा पर्याय समस्त हिंदू बांधवांना भगिनींना आवडला. म्हणून तर 'भोंगे हटवा' विचाराचं लोण देशविदेशात पसरलं. त्यामुळेच राज्यातील, देशातील यंत्रणांना भोंग्यांबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली. त्याचा परिणामही आपल्या सर्वांना लगेच दिसून आला. उत्तरप्रदेशता योगींच्या सरकारनेही हजारो मशिदींवरचे भोंगे उतरवले.

माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी राज्यभरात असंख्य ठिकाणी आंदोलन केले. राज्य सरकारने माझ्या 28,000 महाराष्ट्र सैनिकांना नोटिसा बजावल्या, अनेकांना अटक केली, तर अनेकांना तडीपारी लावली. या देशाचं दुर्दैव हेच की, या देशात नियम मोडणाऱ्यांना सर्व मोकळीक मिळते, परंतु नियम पाळण्याचा आग्रह धरणाऱ्यांना शिक्षा होते. असो. एक लक्षात घ्या, 'भोंगे हटवा' हे आंदोलन थांबलेलं नाही. आपण सर्वांच्या आशीर्वादाने हे आंदोलन चालूच राहील. या आंदोलनाला तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभारही असायलाच हवा.

एक सुजाण नागरिक म्हणून पुढील सूचनांचे पालन आपण केले तर भोंग्यांचा हा प्रश्न आपल्याला कायमचा निकाली काढता येईल. तुम्ही काहीजणांना कदाचित ह्याचा थेट त्रास होत नसेलही, पण तुम्ही त्याबाबत इतरांनाही सांगू शकता.

mns chief raj thackeray letter to the people of maharashtra regarding masjid loudspeaker
'ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि..', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

1. सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरच्या आवाजाची सांगितलेली मर्यादा लोकवस्ती असलेल्या भागासाठी म्हणजे तुम्ही-आम्ही राहतो त्या परिसरासाठी जास्तीत जास्त 45 ते 55 डेसिबल (स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मिक्सरचा आवाज) इतकी आहे. तुमच्या घराजवळच्या लाऊडस्पीकरचा आवाज इतकाच असला पाहिजे. जिथे जिथे या नियमाचे पालन होत नसेल तिथे तिथे तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलिसांना कळवावे. लक्षात असू द्या की, तुम्ही जेव्हा अशा प्रकारची गोष्ट पोलिसांना कळवता तेव्ही तुम्ही लाऊडस्पीकरशी संबंधित लोकांविरोधात तक्रार करत नसता किंवा गुन्हा दाखल करत नसता. तुम्ही फक्त कळवत असता आणि संबंधितांवर राज्यशासनच्या (State) वतीने पोलीस गुन्हा दाखल करत असतात आणि पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी पोलिसांचीच असते. तुम्ही कळवल्यानंतरही पोलिसांकडून कायद्याचे पालन झाले नाही तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) केल्याचा ठपका लागू शकतो.

2. लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरातूनच स्वत:च्या मोबाइलवरुन 100 क्रमांक डायल करुन पोलिसांना माहिती देऊ शकता. पोलिसांना ट्विटर आणि फेसबुकवर टॅग करुनही तुम्ही ही माहिती देऊ शकता. कोणत्याही प्रकारे तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली तर त्या तक्रारीची नोंद स्वत:कडे ठेवायला विसरु नका.

3. सर्वात महत्त्वाचं. माझं हे पत्र घेऊन तुमच्या घरी येणारा माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, त्याचं नाव आणि मोबाइल क्रमांक तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह करुन ठेवा. कोणत्याही संकटात, अडीअडचणीच्या वेळी माझा हा महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी धावून येईल.

आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या, अपुऱ्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा अशा अनेक प्रश्नांमुळे गोंधळ उडालेला आहे. पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडलेले भाव आणि महागाई यांमुळे तर जनता होरपळली आहे. बेरोजगारीचा प्रश्न तर दिवसेंदिवस राक्षसीरुप धारण करताना दिसत आहे. हे सर्व प्रश्न गंभीर आहेतच; पण त्याचबरोबर आपल्या मानसिक आणि सामाजिक शांततेचा विषयही तितकाच महत्त्वाचा आहे, हे विसरुन चालणार नाही. जसा हा भोंग्यांचा विषय आपण सर्वांनी मिळून सोडवला तसेच हे इतर प्रश्नही आपण हातात हात घालून एकत्रितपणे सोडवू, असा मला विश्वास आहे.

एकदाचा या विषयाचा तुकडा पाडूनच टाकूया!

असं या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी हे पत्र इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा तीनही भाषेत काढलं असून ते महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहचलं पाहिजे असे आदेशही दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in