"धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते" राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

वाचा सविस्तर काय म्हटलंय राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात
MNS Chief Raj Thackeray Letter to Devendra Fadnavis
MNS Chief Raj Thackeray Letter to Devendra Fadnavis

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील ही घोषणा गुरूवारी देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर मी सत्तेत सहभागी होणार नाही असंही म्हटलं होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांना पक्षाचा आदेश आल्यानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारवं लागलं. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती त्यांच्या नाराजीची. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे.

काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी j Thackeray) पत्रात?

देवेंद्र फडणवीस,

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

यांसी सस्नेह जय महाराष्ट्र

प्रिय देवेंद्रजी,

सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्वीकारल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं, असो...

तुम्ही यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्षे काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठी अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असून आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्री म्हणून सूत्रं हाती घेतलीत. पक्ष,पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधिलकी म्हणजेय काय असतं त्याचा हा वस्तुपाठ आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील तसंच संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!

आता जरा आपल्यासाठी- ही बढती आहे की अवनती यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. या मागे ओढलेल्या दोरीला कुणीही माघार म्हणत नाही. तुम्हाला याही पुढे बराच राजकीय प्रवास करायचा आहे.

एक निश्चित तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!

आपला मित्र

राज ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असलं तरीही ते नाराज असल्याची चर्चाही रंगली आहे. कारण अमित शाह यांनी ही सगळी खेळी केल्याचं बोललं जातं आहे. दुसरीकडे नागपुरात जे बॅनर लावण्यात आले तिथेही अमित शाह यांचा फोटो लावला गेला नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तसंच एक प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांना महाराष्ट्राने पाहिलं आहे. यामुळेच ते पुन्हा येतील असं वाटलं होतं. मात्र तसं घडलं नाही. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in