
हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न घेता एक निवडणूक लढवून आणि ती जिंकून येऊन दाखवावी असं आव्हान नवनीत राणा यांनी दिलं आहे. मुंबई तकसोबत नवनीत राणांनी संवाद साधला. लीलावती रूग्णालयातून आज नवनीत राणा यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी हे आव्हान उद्धव ठाकरेंना दिलं आहे. तसंच अजूनही हा संघर्ष संपलेला नाही हेच त्यांनी आपल्या बोलण्यातून दाखवून दिलं आहे.
काय म्हणाल्या आहेत नवनीत राणा?
"मी उद्धव ठाकरेंना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावं आणि लोकांमधून निवडून दाखवावं. वडिलांचं नाव न घेता म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न घेता निवडणूक लढवून आणि जिंकून येऊन दाखवा" असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या ज्या जिल्ह्यात उभे राहतील तिथे मी उभी राहून मी त्यांच्याविरोधात जिंकून दाखवते असंही नवनीत राणा म्हणाल्या.
मुंबईत पुन्हा येणार का? असा प्रश्न विचारला असता मी मुंबईची मुलगी आहे, मला मुंबईत येण्यापासून कुणीही अडवू शकत नाही तेवढी हिंमत कुणामध्ये नाही असंही नवनीत राणा म्हणाल्या. महापालिका निवडणूक आता येऊ घातली आहे त्यासंदर्भातही त्यांनी शिवसेनेला आव्हान दिलं आहे.
दोन पिढ्यांपासून मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे आहे. मात्र येणाऱ्या काळात मुंबईची जनता आणि रामभक्त त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. मी पूर्ण ताकदीने मुंबई महापालिका निवडणुकीत उतरणार आहे. शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची लंका तयार केली आहे ती लंका दहन केल्याशिवाय गप्प बसणार नाही असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
एवढंच नाही तर नवनीत राणा म्हणाल्या की, "माझा ठाकरे सरकारला सवाल आहे की मी अशी काय चूक केली आहे? की त्याची मला शिक्षा देण्यात आली. जर हनुमान चालीसाचं पठण करणं आणि भगवान श्रीराम यांचं नाव घेणं गुन्हा असेल आणि त्यासाठी १३-१४ दिवसांची शिक्षा ठाकरे सरकारने दिली आहे.. त्यांनी मला १४ दिवस नाही तर १४ वर्षे शिक्षा दिली तरीही मी भोगायला तयार आहे." असंही नवनीत राणांनी म्हटलं आहे.
५ मे रोजी मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या खासदार नवनीत राणा यांना आज सुट्टी मिळाली. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
नवनीत राणा ज्यावेळी लिलावती रुग्णालयातून बाहेर आल्या, त्यावेळी त्यांच्या हातात हनुमान चालीसा होती. आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नवनीत राणा म्हणाल्या, 'हनुमान चालीस पठण केल्याप्रकरणात १४ दिवस नाही, तर १४ वर्ष तुरुंगात राहायला तयार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दम असेल, तर माझ्याविरुद्ध कोणत्याही जिल्ह्यातून लढून दाखवा. मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणारच आहे. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही,' असं त्या यावेळी म्हणाल्या.