
सध्या राज्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकीय घडामोडींवर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सध्याचे राजकीय वातावरण कुणी बिघडवलं याचा विचार केला गेला पाहिजे. मला कार्टून नेटवर्कवरील टॉम अँड जेरी आवडतं; पण सध्या मी ते बघायचे बंद केले आहे. राज्यातील काही नेत्यांच्या ज्या माकडउड्या चालल्या आहेत त्या बघत बसतो. कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला आत टाकतंय हे बघतो. खूप मजा येते.” असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.
कोण म्हणतंय तो मुख्यमंत्री आहे का? कोल्हापूरची सभा उत्कृष्ट झाली, लोक भरपूर आले, पण तुमची डिलीवरी काय होती? तर झिरो असेही ते म्हणाले. “या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत, माझ्या हातात ईडी द्या, मग दाखवतो यांना. ही ‘ईडी’ची चेष्टा झाली आहे. पानपट्टीवर बिडी मिळते तशी अवस्था ‘ईडी’ची झाली आहे. लावा ना ईडी. घ्या ताब्यात सगळे. यांना दांडक्याने सडकून काढले पाहिजे असाही आक्रमक पवित्रा उदयनराजेंनी घेतला.
एका बाजूला फुटपाथवर लोक झोपत आहेत, या लोकांना दिसत नाही का? प्रत्येकाने एकमेकांची पाठ थोपटायची, जेलमध्ये आहे तरी त्याने काही केले नाही. दीड वर्ष, दोन वर्ष जेलमध्ये पण त्याने काही केले नाही म्हणायचे. लोकांना डोळे नाही, लोकांना मेंदू नाही, लोक हसतायत, असं ते म्हणाले. जर निवडणुका लागल्या तर हे कसे उभारणार हे त्यांचे त्यांनाच माहिती असंही उदयनराजेंनी स्पष्ट केलं.
नवनीत राणांवर संजय राऊत यांनी जे आरोप केले आहेत त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, सत्तेत असणं चुकीचं नाही, पण सत्तेचा दुरूपयोग करणं या गोष्टीला माफी नाही. सत्तेत आहात म्हणून तुम्ही कसंही कुठेही कनेक्शन जोडणार याला काही अर्थ नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे अशी मागणी काही भाजप नेते करत आहेत. त्याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले की तशी काही अगदी परिस्थिती नाही. एक-दोन लोकांचा दोष असेल त्यांच्यावर कारवाई करा. विषय मिटतो.
महाराष्ट्रात भोंगे आणि हनुमान चालीसा यांचं राजकारण सुरू आहे त्याबाबत मत विचारलं असता उदयनराजे म्हणाले, "आपला भारत ही सगळ्यात मोठी लोकशाही आहे. या विशाल देशात अनेक जाती-धर्मातले लोक वास्तव्य करतात. प्रत्येकाला आपल्या जाती-धर्माबद्दल अभिमान असणं हे योग्य आहे. आपल्या परिने ते त्यांचे धार्मिक विधी पार पाडत असतात. अलिकडे जे काही विषय समोर येत आहे तो म्हणजे लाऊड स्पीकरचा. त्यात सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले आहेत, त्यानुसार योग्य काय ते केलं पाहिजे. अजानसाठी डेसिबलची मर्यादा हवीच. हनुमान चालीसा असेल किंवा इतर धर्मातले लोक त्यांच्या ग्रंथांचं पाठांतर करत असतील तर यात काही गैर नाही."
उदयनराजेंनी बुधवारी साताऱ्यातल्या कास पठारावरील कामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातल्या प्रश्नांबाबत संवाद साधला. ईडीची अवस्था पान टपरीसारखी झाली असं त्यांनी म्हटलं आहे. आता निवडणुका लागल्या तर ही मंडळी कशी उभी राहणार हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे. पण माझे नाव कोणी घेतले तर बघतो. मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी माझ्या नादी लागू नये. असा इशाराही उदयनराजेंनी दिला.