'मिशन राज/प्लान आर' : मनसे नेत्यांना दिलेल्या नोटीसमध्ये पोलिसांनी काय दिलाय इशारा?

Raj Thackeray, loudspeaker Row : राज ठाकरेंनी नमाजसाठी भोंगे वापरणाऱ्या मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा दिलाय इशारा
'मिशन राज/प्लान आर' : मनसे नेत्यांना दिलेल्या नोटीसमध्ये पोलिसांनी काय दिलाय इशारा?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पोलीस सतर्क सावध झाले आहेत. राज्यभरात पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. मुंबई पोलिसांनीही मनसेच्या नेत्यांना नोटीसा दिल्या आहेत. या नोटीसमध्ये 'प्लान आर/मिशन राज'चा उल्लेख करण्यात आलेला आहे. या नोटीसमध्ये मनसे नेत्यांना इशारा दिला आहे.

फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४९ नुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेच्या नेत्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

नोटीसमध्ये काय म्हटलंय?

२ एप्रिल २०२२ रोजी शिवाजी पार्क मैदानामध्ये मनसेची सभा झाली. सदर सभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी केली असून, ३ मे २०२२ पर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास, मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

महाराष्ट्र शासनाने ३ मे २०२२ पर्यंत मशिदींवरील भोंग्यासंदर्भात ठोस कारवाई न केल्यास 'प्लान आर/मिशन राज' राबवणार असल्याचं आपल्या पक्षातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. आपल्या पक्षाच्या भूमिकेस इतर राजकीय पक्ष, संघटना व नेते यांचा विरोध आहे.

आपल्या पक्षाच्या भूमिकेमुळे व आपल्या नेत्यांच्या प्रक्षोभक व्यक्तव्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये तेढ निर्माण होत असून, त्यामधून कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

आपले कार्यकर्ते हे शिवाजी पार्क पोलीस ठाणे हद्दीमध्ये व इतर ठिकाणी राज्य सरकार व इतर पक्षाच्या विरुद्ध आक्षेपार्ह व तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या मजकुराचे पोस्टर व बॅनर लावत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून यापूर्वी मुंबईमध्ये शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामध्ये सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झालेले आहे.

आपल्याकडून शांततेचा भंग होईल वा तशी परिस्थिती निर्माण होईल, अशा प्रकारचे कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य वा वर्तन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

आपल्याकडून अथवा आपल्या कार्यकर्त्यांकडून कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यासाठी आपणास जबाबदार धरण्यात येईल. तसेच सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान झाल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५१ नुसार आपल्याकडून त्याची वसुली केली जाईल, याची नोंद घ्यावी.

सदर नोटीसचा भंग केल्यास आपल्याविरुद्ध भादंवि कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल व ही नोटीस न्यायालयात आपल्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

Related Stories

No stories found.