
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाला. भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत तीनही उमेदवार निवडून आणले. भाजपच्या बेरजेच्या राजकारणांची राज्यात चर्चा होत सुरूये. याच निकालावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केलं असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा अशी मागणीही केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना राणे म्हणाले, "राज्यसभा निवडणूक होण्याअगोदर काहीजण बढाया मारत होते. आम्ही तीन जागा जिंकणार. भाजपची मतं फोडणार. भीम पराक्रम करणार अशा बढाया मारल्या. राज्याच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्याने भाषा वापरली नाही, अशा भाषेत बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते."
"जी भाषा वापरायला नको होती, ती वापरल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यातच नव्हे, तर देशात बेअब्रूही झाली. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, हे दुर्दैव आम्ही समजतो. मुख्यमंत्री विरोधकांना ज्या भाषेत बोलतात ती संसदीय नाही. शिवसेना सांगत होती की, सर्व जागा जिंकणार. काय झालं. संजय राऊतच काठावर आलेत. वाचलेत आमच्या हातातून. त्यांना आघाडीची मतं मिळायला हवी होती. तितकीही मते त्यांना मिळाली नाहीत," असं राणे म्हणाले.
"मला उद्धव ठाकरेंना सांगायचं की, सत्तेसाठी १४५ मतं लागतात. तुम्ही अल्पमतात आलेला आहात. तुम्ही राजीनामा द्या. नैतिकतेचं भान असेल, तर तुम्ही राजीनामा द्या आणि बाजूला व्हा."
"तुम्ही महाराष्ट्राला १० वर्ष मागे नेलं आहे. त्याचबरोबर सत्तारुढ आणि विरोधकातील संबंध धुळीला मिळवले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सत्तेत राहायचा नैतिक अधिकार नाही. तुमचं ८ ते १० आमदार फुटतात. याचा अर्थ विश्वासार्हता नाही. स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही आणि बढाया मारतात. आम्ही विरोधात असूनही आमदार एकत्र ठेवले," असा चिमटा राणेंनी शिवसेनेला काढला.
"आमची मतं तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. तुम्ही अल्पमतात आला आहात आणि त्यामुळे राजीनामा द्या. शरद पवारांनी राज्यसभेचा निवडणुकीच्या निकालानंतर जी प्रतिक्रिया दिली, त्यातून जरा बोध घ्या. चांगल्या चांगलं म्हणणं माणुसकीचा धर्म आहे. शरद पवारांनी त्याप्रमाणे पराभवामुळे आम्हाला कोणताही धक्का नाही. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं. माणसं जपली. आमदार सांभाळले, असं कौतूक शरद पवारांनी केलं आहे," असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
"मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही पात्र नाही आहात. त्यामुळे हा विजय भाजपने मिळवला आहे. येणारी महापालिका निवडणूक जिंकणार आणि २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना २० आमदारही निवडून आणू शकणार नाही. आता ५० आमदार असलेले मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादीने काय केलंय माहितीये का. राजकारण शिकण्यापेक्षा बकवास करतात. वाघ म्हणतात आणि शेळीची कृतीही करत नाही," अशा शब्दात नारायण राणेंनी शिवसेनेवर प्रहार केला.