
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना आज लिलावती रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं. त्याचबरोबर माझ्याविरुद्ध निवडणूक लढवावी असं आव्हानंही राणांनी यावेळी दिलं.
५ मे रोजी मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या खासदार नवनीत राणा यांना आज सुट्टी मिळाली. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
नवनीत राणा ज्यावेळी लिलावती रुग्णालयातून बाहेर आल्या, त्यावेळी त्यांच्या हातात हनुमान चालीसा होती. आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नवनीत राणा म्हणाल्या, 'हनुमान चालीस पठण केल्याप्रकरणात १४ दिवस नाही, तर १४ वर्ष तुरुंगात राहायला तयार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दम असेल, तर माझ्याविरुद्ध कोणत्याही जिल्ह्यातून लढून दाखवा. मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणारच आहे. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही,' असं त्या यावेळी म्हणाल्या.
'मुंबई महापालिका निवडणुकीत मी पुर्ण ताकदीने उतरणार आहे. शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी जनतेमध्ये जाईन. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा आणि रामाचं नाव घेणाऱ्यांना त्रास दिल्यानंतर काय परिणाम होतात,' असं राणा म्हणाल्या.
रवी राणा काय म्हणाले?
नवनीत राणा यांना सु्ट्टी मिळण्यापूर्वी रवी राणा माध्यमांशी बोलले होते. 'जेव्हा पोलीस आमच्या घरी आले होते, तेव्हा आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चला तुम्हाला जामीन देण्यात येईल, असं सांगितलं. आम्ही वॉरंट मागत असतानाही त्यांनी तफकाफडकी आम्हाला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.'
'गाडीत बसताना शिवसैनिकांनी आमच्यावर दगड, पाण्याच्या बाटल्या फेकल्या. त्याच्यावर कारवाई केली नाही. आम्हाला पोलीस ठाण्यात नेऊन चहा पाजला. त्यानंतर रात्री सांताक्रूझला लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर आम्हाला पाणीसुद्धा दिलं नाही. उद्धव ठाकरे सरकार एका महिलेला घाबरल्याने त्यांनी एवढी सक्तीची कारवाई केली,' असं रवी राणा म्हणाले होते.
'मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याचं आम्ही पालन करणार आहोत. राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचं कोर्टानं सांगितल्यानंतरही त्यावर आक्षेप घेण्याचं काम संजय राऊत यांनी केलं आहे. मला असं वाटतं संजय राऊत चवन्नीछाप आहेत. संजय राऊत कोर्टाच्या निर्णयावरही टीका करतात,' असं रवी राणा म्हणाले होते.