Ajit Pawar: ''पक्ष बदलून मुख्यमंत्री होणं गैर नाही, ज्या घरात वाढलो ते घर उद्ध्वस्त करणं बेईमानी''

वाचा सविस्तर बातमी अजित पवार काय म्हणाले?
NCP Leader Ajit Pawar Says this not good to destroy your house and Become a CM Of Maharashtra
NCP Leader Ajit Pawar Says this not good to destroy your house and Become a CM Of Maharashtra

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिर्डीतल्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. पक्ष बदलणं चूक नाही, आपला पक्ष बदलून मुख्यमंत्री होणंही गैर नाही. मात्र ज्या घरात वाढलो ते घर उद्ध्वस्त करणं ही बेईमानी आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकटं लढण्याची तयारी करा असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध रहावं

अजित पवार यांनी पक्षातल्या लोकांना सावधगिरी बाळगण्याचाही सल्ला दिला आहे. आपल्या पक्षातल्या लोकांना पण आमिषं दाखवली जात आहे. आपल्या लोकांनाही काही सांगितलं जातं आहे, आश्वासनं दिली जात आहेत. मात्र त्यांना बळी पडू नका असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. जे पक्ष सोडून गेले आहेत त्यांना पश्चात्ताप होतो आहे. त्यांना वाटतं की आपण चूक केली. ज्या घरात वाढलो असतो ते घर उद्ध्वस्त करणं योग्य नाही. शिवसेनेच्या बाबत जे घडलं ते महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेलं नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

स्वबळावर लढायची तयारी करा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी करण्यासाठी कोण पुढे येतंय याची वाट बघत बसू नका. त्यापेक्षा स्वबळावर लढायची तयारी करा. आपली ताकद स्थानिक पातळीवर दिसली पाहिजे. तरचं मित्र पक्ष आपल्यासोबत चर्चा करायला येतील असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सत्तेत कशी येईल हे पाहिलं पाहिजे आणि त्यासाठी आपला पक्ष मजबूत केला पाहिजे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आपल्याला विधान परिषदेच्या पाच जागा निवडून आणायच्या आहेत. यासाठी आतापासून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. फेब्रुवारी 2023 मध्ये पाच विधानपरिषद निवडणुका आहेत. औरंगाबाद शिक्षक, कोकण शिक्षक, नाशिक पदवीधर, नागपूर शिक्षक, अमरावती पदवीधर या निवडणुका पार पडणार आहेत. आपला नागपूर आणि अमरावती येथे आमदार नाही. आपल्याला या जागा मिळवायच्या आहेत. औरंगाबाद राष्ट्रवादीकडे आहे. कोकण शिक्षक मतदार संघाची जागा मित्र पक्षाकडे आहे. मित्र पक्ष काँग्रेसकडे नाशिकची जागा आहे. अमरावतीची जागा विरोधकाकडे आहे. आपल्याकडे या जागेसाठी उमेदवार आहे. याबाबत मित्र पक्षांसोबत चर्चा करू, असंही अजित पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in