
मनीष जोग, जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देऊ केली आहे. 2019 पासून सभागृहापासून दूर असलेल्या खडसेंना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊन त्यांचा राजकीय विजनवास संपविण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे जळगाव जिल्ह्यात खडसें समर्थकानी प्रचंड आनंद साजरा केला आहे.
यावेळी खडसे समर्थकांनी राष्ट्रवादी कार्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून आपला आनंदोत्सव साजरा केला आहे. ओबीसी नेत्यासोबत राष्ट्रवादीने न्याय केला आहे अशी खडसे समर्थकांची यावेळी भावना दिसून आली. मात्र, याचवेळी त्यांनी अशीही मागणी केली की, ज्याप्रकारे खडसेंना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊ केली आहे तशाच पद्धतीने मंत्रिपद देखील द्यावं.
विधानपरिषद निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाने कोणाला दिली उमेदवारी?
राज्यात 20 जून रोजी विधान परिषदेचीही निवडणूक आहे. शिवसेना, काँग्रेस, भाजप या पक्षांनी आपले उमेदवार आधीच जाहीर केले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांबाबत काही स्पष्टता नव्हती. पण आज राष्ट्रवादीनेही आपले उमेदवार जाहीर केले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. यावेळी त्यांनी रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथ खडसे या दोघांना राष्ट्रवादीने विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली असल्याचं जाहीर केलं होतं.
भाजपाने विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची नावे कालच जाहीर केली होती. ज्यामध्ये त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, राम शिंदे यांची नावे भाजपने जाहीर केली होती. तसेच सहाव्या जागेसाठीही भाजपने अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांना पाठिंबा दिला आहे. भाजपने सहावा उमेदवार दिल्याने आता या निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.
दुसरीकडे काँग्रेसने भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच शिवसेनेने सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना उमेदवारी देऊ केली आहे.
विधान परिषद निवडणुकीत प्रचंड चुरस
राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने निवडणूक होणार आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेसाठी देखील भाजपने 5 अधिकृत उमेदवार दिले आहेत. याशिवाय सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे. त्यांना भाजप पाठिंबा देणार असल्याचं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी भाजपने जवळजवळ 6 उमेदवार दिले आहेत. तर महाविकास आघाडीतील तीनही पक्षाने प्रत्येकी 2-2 उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आता 12 पैकी कोणते 10 उमेदवार निवडून जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.