
उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या राजकीय घडामोडी आणि राजकीय भूकंपानंतर राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर शिंदे गटाने जल्लोष केल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे.
दीपक केसरकर यांनी काय म्हटलं आहे?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत लढत असताना आम्हाला आमच्या नेत्यांना म्हणजेच उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे लढा द्यावा लागला याचं दुःख आम्हा प्रत्येकाच्या मनात आहे. गेल्या दीड वर्षापासून आम्ही त्यांना सांगत आहोत की जी आपली नैसर्गिक युती आहे म्हणजेच भाजप त्यांच्यासोबत आपण गेलं पाहिजे. मात्र शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका बदलली नाही. त्यातून मतभेद तसंच वाद निर्माण झाले. त्यांनी जर आमचं ऐकलं असतं तर ही वेळ आलीच नसती.
महाराष्ट्राच्या जनतेने भाजप-शिवसेना या युतीलाच कौल दिला होता. आपण सोबत राहिलं पाहिजे याच मताचे आम्ही होते. एकही बंडखोर आमदार या ठिकाणी मंत्रिपदाच्या आशेवर आलेला नाही. उलट आहेत ती मंत्रिपदं सोडून या ठिकाणी लोक आलेत ही बाब विचारात घेतली पाहिजे. आता आमच्या गटाची मिटिंग झाली. तरीही मंत्रिमंडळाच्या बातम्या चालवल्या जात आहेत ज्यात काहीही तथ्य नाही.
भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठींशी बोलून घेतील. काहीतरी करून इथे असलेल्या आमदारांमध्ये चलबिचल निर्माण करण्याच्या हेतूने खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्याकडे माध्यमांनी लक्ष देऊ नये.एवढंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यांतर शिंदे गटाने जल्लोष केला या बातम्याही खोट्या आहेत. असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं.
ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्यातले सहा मंत्री आहेत ते मंत्रिपद सोडून आले आहेत. जो बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता, जो हिंदुत्वाचा विचार होता त्यासाठी ते इथे आले आहेत. ज्यासाठी पंचवीस वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी युती केली होती तो लक्षात घेतला पाहिजे. भाजपसोबत आपली २५ वर्षे युती होती. त्यानंतर आपण भांडलो. पुन्हा एकत्र आलो तसंच आता जे मतभेद झाले ते मुख्यमंत्री कोण असावा? यावरून झाले होते. दोन पक्षांत इतकं वैमनस्य आलं नव्हतं की ते वेगळे व्हावेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज एक व्यंगचित्र पोस्ट केलं आहे. त्यात आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला हेच त्यांना म्हणायचं आहे. मात्र आम्ही हे का करू? संजय राऊत यांनी बोलताना विचार केला पाहिजे. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार पाठीत खंजीर खुपसला तो कुणाच्या पाठीत? तुम्ही युती तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेला होतात. त्यावेळी लोक तुम्हाला हे म्हणू शकले असते की तुम्ही खंजीर खुपसला. लोकांचं जे मत होतं ते भाजप-शिवसेना युतीलाच मिळालं होतं. काँग्रेस राष्ट्रवादी पराभूत झाले होते. त्यामुळे अशी स्टेटमेंट काढून जनतेत असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
आज माझी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की कुणालाही मुलाखती दिल्या जात आहेत. त्यांच्याकडून जर एखादा शब्द उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबाबाबत चुकीचा निघाला तर तो भाजपचा व्ह्यू आहे असं भासवलं जातं त्याला काही अर्थ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. सातत्याने संजय राऊत यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केला.
संजय राऊत जेवढं कमी बोलतील तेवढं चांगलं होईल. आत्ता आमची शिंदे यांच्यासोबत बैठक झाली आहे. एकनाथ शिंदे हे असे नेते आहेत जे सगळ्या आमदारांशी चर्चा करतात. सगळ्यांशी चर्चा करूनच ते धोरण ठरवतात. महाराष्ट्रात कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो महाराष्ट्र हितासाठी घेण्याचे अधिकार आम्ही सगळ्यांनी त्यांना दिले आहेत. शिवसेना नाहिशी करण्याचा प्रयत्न सोयीस्करपणे केला जात होता.
आम्ही सगळ्यांनी जाऊन आपली व्यथा उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहे. शिवसेनेच्या आमदारांचं म्हणणं हे पडलं की आम्ही मतं देतो. नेत्यांना निवडून आणतो. आमचे उमेदवार पाडले जातात हे सगळं आम्ही सांगितलं होतं. राज्यसभेवर सामान्य शिवसैनिक पाठवेन असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्यात असं झालं नाही. विधानपरिषदेच्या निवडणुकीतही तेच झालं. मी त्यावेळी वर्षा बंगल्यावर तेव्हा उपस्थित होतो. कार्यकर्त्यांना चुकीच्या गोष्टी करण्यासाठी प्रेरित केलं जातं आहे. जे शिवसैनिक महाराष्ट्रात आहेत त्यांना आणि सगळ्यांनाच मला सांगायचं आहे कुणीही हे समजू नका की चुकीचा विचार करू नका.