निंबाळकर-पाटील भावकीत कधी पडली संघर्षाची पहिली ठिणगी? दोन पिढ्यांतील ‘रक्त’रंजित इतिहास!

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उस्मानाबाद: सध्या उस्मानाबाद जिल्ह्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओम राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पीकविम्याच्या श्रेयवादाची लढाई सध्या सुरु आहे. यावरुनच शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पाटील आणि निंबाळकर यांच्याच हमरीतुमरी झाली. तुझी औकात काय? पार इथपर्यंत खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी राणा पाटील यांना सुनावलं तर राणा पाटील यांनी देखील ‘बाळा’ म्हणून खासदारांना हिनवलं. (nimbalkar patil enmity in osmanabad what exactly is the controversy)

याची चर्चा दिवसभर उस्मानाबाद जिल्ह्यात सुरु होती. अखेर रात्री राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी ओमराजेंचा एकेरी उल्लेख करत नको त्या गोष्टींचा उल्लेख करत गाठ माझ्याशी आहे, असा इशारा देऊन टाकला. आता हा वाद आणखी पेटण्याचे चिन्हे आहेत. कारण येणारा काळ हा निवडणुकांचा काळ आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात येणाऱ्या काळात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे. दोन्ही नेत्याचे कार्यकर्ते देखील एकमेकांना पाण्यात पाहतात. अनेकदा दोन्ही गटात वाद पाहायला मिळाला आहे. आता पाटील आणि निंबाळकर यांच्यातला वाद काय आहे, वादाचं नेमकं कारण काय, हे आपण यातून जाणून घेणार आहोत.

ओमराजे निंबाळकर-राणा जगजितसिंह पाटील : दोघांमध्ये नातेसंबध काय?

या वादाला जाणून घेण्याच्या पूर्वी पाटील आणि निंबाळकर यांच्यात नातेसंबध काय आहेत, हे जाणून घेणं गरजेचं आहे. भूपालसिंह राजेनिंबाळकर यांना सात मुलांपैकी संताजी आणि बाजीराव असे दोन मुलं होती. बाजीराव यांना तेरच्या पाटलांनी दत्तक घेतलं. बाजीराव पाटलांच्या 7 मुलांपैकी पद्मसिंह पाटील हे एक. तर संताजी राजेनिंबळाकर यांचे पवनराजे निंबाळकर हे सुपुत्र. म्हणजे पवनराजे संताजी निंबाळकर आणि पद्मसिंह बाजीराव पाटील हे सख्खे चुलत भाऊ. राणाजगजित सिंह पद्मसिंह पाटील आणि ओमराजे पवनराजे निंबाळकर त्या नात्याने चुलत-चुलत भाऊ, असे यांच्यातील नातेसंबध.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पवनराजेंची हत्या: निंबाळकर-पाटलांच्या राजकीय वैमनस्याचा रक्तरंजित इतिहास

निंबाळकर-पाटील : दोन भावांमध्ये वाद

पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय पदवी घेऊन ढोकीच्या शासकीय रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम सुरु केलं. ढोकीतील पारधी समाजातील प्रकरणामुळे ते प्रकाशझोतात आले. पुढे राजकारणात आले आणि शरद पवारांचे जवळचे बनले. पुढे आमदार आणि त्यानंतर मंत्री बनले. पण मंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांचा मतदारसंघातील संपर्क थोडाफार कमी झाला. तिथली जबाबदारी त्यावेळी पवन,जिवन आणि रेवन हे त्रिकुट पाहायचे, असे जाणकार सांगतात. पवन म्हणजे पवनराजे निंबाळकर, जिवन म्हणजे त्यांचे मेहूणे जीवनराव गोरे आणि तेरचे त्यांच्या सहकारी रेवनसिद्ध लामतुरे.

ADVERTISEMENT

त्यामुळे एखाद्याच्या लग्नाला, कार्यक्रमाला किंवा अंत्ययात्रेला पवनराजे पद्मसिंह पाटलांचे प्रतिनिधी म्हणून जाऊ लागले. त्यामुळे तिथं पवनराजेंचं प्रस्थ वाढू लागलं. मोठा जनसंपर्क त्यांचा तयार झाला. नंतर “राजकीय जाणकार सांगतात, तेरणा साखर कारखाना आणि डीसीसी बँक आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातील वितुष्ट टोकाला पोहोचलं होतं. दोघे भाऊ वेगवेगळे झाले.

ADVERTISEMENT

पवनराजेंची हत्या: निंबाळकर-पाटलांच्या राजकीय वैमनस्याचा रक्तरंजित इतिहास

ओमराजे निंबाळकर-राणा जगजितसिंह पाटील : 2004 च्या निवडणुकीत दोघे होते समोरासमोर

पद्मसिंह पाटील आणि पवनराजे यांच्यातील वाद वाढतच चालला होता. 2004 सालच्या निवडणुकीत दोघे एकमेकांच्या समोर उभे राहिले. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस तर पवनराजे निंबाळकर हे अपक्ष उभे राहिले. राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. कारण तोपर्यंत पद्मसिंह पाटील हे राज्याचे महत्वाचे नेते बनले होते, त्यात पद्मसिंह पाटील शरद पवारांचे निकटवर्तीय. सहा वेळा सलग निवडून आलेल्या पद्मसिंहाना पवनराजेंनी जोरदार कांटे की टक्कर दिली. पद्मसिंह पाटलांचा निसटता विजय झाला. सुरुवातीपासून पवनराजे लीडवर होते. मात्र शेवटच्या गावांनी पद्मसिंहांना तारलं. पाटलांचा विजय जरी झाला असला तरी हा त्यांना मोठा धक्का होता. जिल्ह्यात एकहाती वर्चस्व असताना सुद्धा अवघ्या काही मतांनी त्यांचा निसटता विजय झाला होता.

पवनराजे निंबाळकर हत्या : राज्याला हदरवणारी घटना

त्यानंतर पवनराजे निंबाळकर हे काँग्रेसमध्ये गेले. त्यांनी त्यांचं राजकारण काँग्रेसमधून सुरु ठेवलं. पाटलांना टक्कर देण्यासाठी कोणीतरी आलंय, असं बोललं जायचं. मात्र, अचानक एक बातमी आली आणि उस्मानाबाद जिल्ह्याला त्या बातमीने हदरवून टाकलं. 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यात आली होती. पवनराजे मोटारीतून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात पवनराजे आणि त्यांचे वाहनचालक समद काझी या दोघांचाही मृत्यू झाला.

पवनराजे निंबाळकरांच्या खुनाचा सीबीआयकडे तपास

कळंबोली पोलिसांकडे या खुनाचा तपास होता. परंतु निंबाळकर कुटुंबियांनी अक्षेप घेत सीबीआयकडे तपासाची मागणी केली. सीबीआयला 2008 साली काही लीड मिळाली. त्यांनी डोंबिवलीतील व्यापारी पारसमल जैन याला अटक केली. पारसमल जैननं पद्मसिंह पाटील यांनी पवनराजे निंबाळकर यांची सुपारी दिल्याचं सीबीआयला सांगितलं. यात सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना 2009 मध्ये अटक केली. पवनराजे निंबाळकर यांच्यामुळे पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला धोका असल्याने ही हत्या झाल्याचं CBI ने आरोपपत्रात म्हटलंय. पद्मसिंह पाटील सध्या जामिनावर बाहेर आहेत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

पद्मसिंह पाटलांकडून हा आरोप नेहमी फेटळून लावण्यात आला आहे. “पद्मसिंह पाटील यांनी पवनराजे यांना राजकारणात आणलं. आपल्या सख्ख्या भावापेक्षाही जास्त त्यांनी चुलत भाऊ पवनराजेंना प्रेम दिलं. त्यामुळे ते त्यांच्या खूनाचा विचार करू शकत नाहीत.”, असं पद्मसिंह पाटील यांचे वकील भूषण महाडिक यांनी बीबीसीकडे सांगितलं.

पवनराजे निंबाळकरांच्या हत्येनंतर ओमराजे निंबाळकर राजकारणात सक्रिय

पवनराजे यांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा त्यांचा मोठा मुलगा ओमराजे निंबाळकर यांनी पुढे सुरु ठेवला. वडिलांच्या हत्येनंतर तेरणा सहकारी कारखाना, जिल्हा परिषद यांसारख्या निवडणुकीत ओमराजेंनी मुसंडी मारली. पुढे काँग्रेसमधून शिवसेनेत जात 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला. 2014 साली राणा पाटील यांनी पराभवाचा वचपा काढला. मात्र 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांनी राणा पाटलांचा दारूण पराभव केला.

लोकसभा निवडणुकीनंतर राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आणि भाजपच्या चिन्हावर तुळजापूर मतदारसंघातून विजय मिळवला. तर 2014 साली लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर डॉ. पद्मसिंह पाटील राजकारणातून बाजूला पडले. त्यांचा वारसा पुढे त्यांचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील हे चालवत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राणा पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते, अशा चर्चा होत असतात. तर ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा दाखवून मातोश्रीचे जवळचे बनलेत.

हा वाद पुढच्या पिढीतही सुरु

इतक्या वर्षात राज्यातील राजकारण खुप बदललं आहे. ओमराजे काँग्रेसमधून शिवसेनेत गेले तर राणा जगजितसिंह पाटील राष्ट्रवादीतून भाजपात, तरी देखील या दोन घराण्यातील वाद काही कमी होताना दिसत नाही. कोणत्या न कोणत्या कारणामुळे हे दोन्ही नेते एकमेकांच्या आमने-सामने येत असतात आणि अधून-मधून असे वाद पाहायला मिळत आहे. त्यात आता पुढच्या पीढीतील मल्हार पाटलांनी देखील उडी घेतली आहे. त्यामुळे हा वाद कुठे जाऊन थांबतो, हे पाहावं लागेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT