पुणे विमानतळपासून अर्थव्यवस्थेपर्यंत सीतारामन सविस्तर बोलल्या; बारामतीवर फक्त दोन वाक्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या 3 दिवसीय दौऱ्याची शनिवारी सांगता झाली. या दौऱ्यानंतर त्यांनी पुण्यात विधान भवनात जिल्हा प्रशासन, महापालिका, पीएमआरडीए, पोलिस प्रशासन अशा सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. या परिषदेत त्या पुणे विमानतळ, महागाई, राज्यातील प्रकल्प, महाविकास आघाडी सरकारवर टीका अशा सगळ्या मुद्द्यांवर विस्ताराने बोलल्या. पण ज्या मुख्य कारणासाठी सीतारमन आल्या होत्या, त्या बारामतीच्या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी दोनच वाक्यात संपविले.

महाविकास आघाडीवर हल्लाबोल :

वेदांता-फॉक्सकॉन हा एक प्रकल्प गुजरातला गेला म्हणून जे लोक रडत आहेत, त्यांनी राज्यातील 4 मोठे प्रकल्प केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रेय नको म्हणून अडवून ठेवले आहेत अशी टीका सीतारमन यांनी केली. त्या म्हणाल्या, आशिया खंडातील सर्वात मोठी नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला आडवणारे कोण आहेत? पालघर जिल्ह्यात सागरमाला प्रकल्पाअंतर्गत वाढवण पोर्ट हा ६५ हजार कोटीचा प्रकल्प अडवून ठेवला, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष होते. मुंबईसाठी आवश्‍यक असणारा मेट्रो फेज तीन रोखला, त्याचा खर्च ४ हजार कोटींनी वाढला. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन बद्दलही महाविकास आघाडीने उत्तर द्यावे.

पुणे विमानतळाचे काम मार्च 2023 मध्ये पूर्ण करण्याचे आदेश :

पुणे विमानतळाच्या विस्तारिकरणाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत ३० टक्के काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सीतारमन यांनी यावेळी दिली. मागील जवळपास दीड वर्षापासून पुणे विमानतळावर नव्या टर्मिनल व कार्गो सेवेसाठी काम सुरू आहे. दरम्यान या बैठकीत पुरंदर विमानतळाबाबत या बैठकीत चर्चा झालेली नसल्याचेही सीतारमन यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बारामती बद्दल काय म्हणाल्या सीतारमन?

बारामती लोकसभा मतदारसंघात मी निवडणुकीसाठी नाही तर भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी आलेली आहे. बारामतीमध्ये भाजपचे संघटन चांगले आहे, आमचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. कोरोनामध्ये भाजपच्या लोकांनी जास्त मदतकार्य केले हे मला लोकांनी सांगितले. मी संघटनेबद्दल बोलत आहे, मला संघटनेबाबत कोणतेही प्रश्‍न विचारा, मी निवडणुकीसाठी आलेली नाही, असे म्हणतं केवळ 2 ते 3 वाक्यात त्यांनी संपूर्ण दौऱ्याबद्दल भाष्य केले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT