
मुंबई: 'आता सैन्य हे कंत्राटी पद्धतीने भरणार आहेत. चार वर्षाचं कंत्राट जगाच्या पाठीवरती असा मूर्ख निर्णय कोणत्याही राज्यकर्त्याने घेतला नाही. या देशात तुघलक होता वेडा महंमद तुघलक त्याने सुद्धा असा निर्णय कधी घेतला नसता की, कंत्राटी पद्धतीने सैन्य.' अशी अत्यंत घणाघाती टीका संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकावर केली आहे. अग्निपथ योजनेवरुन देशभरात प्रचंड आक्रोश व्यक्त केला जात आहे. याचबाबत बोलताना राऊतांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.
शिवसेनेच्या 56 व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेने एक छोटोखानी कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून केवळ चार वर्षांसाठी सैन्यात तरुणांची भरती करण्याचा निर्णय हा अत्यंत चुकीचा असल्याचा म्हणत राऊतांनी थेट महमद तुघलकाशी मोदी सरकारची तुलना केली आहे.
पाहा संजय राऊतांनी नेमकी काय टीका केली:
'संपूर्ण देश आज पेटलेला आहे. तुम्ही कुठल्या अग्निवीरांची भरती करणार? सैन्यात आता कंत्राटी पद्धतीने सैन्य भरणार. सैन्य पोटावर चालतं हे आम्हाला माहित होतं आतापर्यंत पण आता सैन्य हे कंत्राटी पद्धतीने भरणार आहेत. चार वर्षाचं कंत्राट जगाच्या पाठीवरती असा मूर्ख निर्णय कोणत्याही राज्यकर्त्याने घेतला नाही. या देशात तुघलक होता वेडा महंमद तुघलक त्याने सुद्धा असा निर्णय कधी घेतला नसत की, कंत्राटी पद्धतीने सैन्य.' अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
'पण या देशात चार वर्षाचं तीन वर्षाचं कंत्राट.. देशाचं रक्षण कोणी करायचं? हे ज्यांना कळत नाही त्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत. ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात. देशाचं सैन्य नाही. म्हणून अख्ख्या देशामध्ये मोदी सरकारच्या निर्णयाविरुद्ध एक अराजक निर्माण झालं आहे.' असं म्हणत संजय राऊतांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
'तरुण रस्त्यावर आहेत, पेटलेले आहेत. महाराष्ट्र शांत आहे पण महाराष्ट्र खदखदतोय हे लक्षात घ्या. महाराष्ट्र शांत यासाठी आहे कारण या राज्याची सूत्रं ही उद्धव ठाकरे यांच्या हातात आहेत म्हणून महाराष्ट्र शांत आहे. ती सूत्रं शिवसेनेकडे आहेत तोपर्यंत राज्य स्थिर आणि शांत राहील.' असा दावा देखील संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.