
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी एक शस्त्रक्रिया होणार होती. पण या शस्त्रक्रियेआधी त्यांच्या शरीरात कोरोनाचे डेड सेल आढळून आल्याने त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच त्यांना 15 दिवस क्वॉरंटाईन देखील करण्यात आलं आहे. त्यातच आता दोन दिवसांनी म्हणजे 14 जून रोजी राज ठाकरेंचा वाढदिवस आहे. अशावेळी पुन्हा गाठीभेटींमधून संसर्ग होऊ नये यासाठी कोणलाही न भेटण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. यासाठी एक ऑडिओ रेकॉर्ड स्वत: राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
'पुढल्या आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरलेली आहे आणि त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करु इच्छित नाही. म्हणून मी 14 तारखेला कोणालाही न भेटण्याचा निर्णय केलेला आहे.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
राज ठाकरेंच्या ऑडिओ क्लिपमधील शब्द जसाच्या तसा:
'माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो.. त्या दिवशी पुण्याच्या सभेत मी सर्वांना सांगितलं. की, माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे म्हणून... जेव्हा मी हॉस्पिटला अॅडमिट झालो आणि माझ्या सगळ्या टेस्ट वैगरे झाल्या आणि रात्री मला डॉक्टरांनी सांगितलं की, काय तरी कोव्हिडचा डेड सेल आहे. ते काय असं ते मलाही नाही माहीत आणि कोणालाच माहित नाही. असो.. आणि मग ती शस्त्रक्रिया माझी रद्द झाली.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
'आता त्या कोव्हिडच्या ज्या काही गोष्टी असतात त्याप्रमाणे 10-12 दिवस क्वॉरंटाईनमध्ये असतो आपण त्याप्रमाणे घरी आहे. या सगळ्या दरम्यान 14 तारखेला माझा वाढदिवस आला आहे. आपण सर्व जण दरवर्षी प्रेमाने-उत्साहाने माझ्या वाढदिवसाला मला भेटायला येतात. मी देखील तुम्हा सर्वांची आतुरतेने वाट पाहत असतो.' असंही राज ठाकरे म्हणाले.
'सर्वांना भेटल्यावर बरंही वाटतं. पण या वर्षी मला 14 तारखेला वाढदिवसाला कोणाला म्हणजे कोणालाच भेटता येणार नाही. याचं कारण परत त्या गाठीभेटीमध्ये कोणाला संसर्ग झाला आणि त्यातून मला परत समजा शस्त्रक्रिया पुढे ढकलाला लागली तर शेवटी मी किती पुढे ढकलायची याला देखील मर्यादा आहे.' असं राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना सांगितलं.
'त्यामुळे पुढल्या आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरलेली आहे आणि त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करु इच्छित नाही. म्हणून मी 14 तारखेला कोणालाही न भेटण्याचा निर्णय केलेला आहे. आपण जिथे आहात तिथेच राहा. माझी जेव्हा शस्त्रक्रिया पूर्ण होईल, बरं वाटायला लागेल त्यानंतर मी आपणा सगळ्यांना निश्चित भेटेन. पण 14 तारखेला आपण कृपया कोणीही घरी येऊ नये ही विनंती करण्यासाठी मी आपल्याशी बोलतोय. धन्यवाद.' असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या कोणीही भेटण्यासाठी येऊ नये असं आवाहन केलं आहे.