'बाबरी पडली तेव्हा राज कुठे होते?'; उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर

मुंबईच्या बुस्टर डोस सभेत बोलत असताना फडणवीसांचा घणाघात, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही सेनेवर टीका
'बाबरी पडली तेव्हा राज कुठे होते?'; उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर

मनसे आणि भाजप आगामी काळात एकत्र येणार का प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आहे. भाजप-मनसेच्या या संभाव्य युतीवर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना प्रवक्त्यांच्या केलेल्या मार्गदर्शनात, बाबरी पडली तेव्हा राज कुठे होते? असा प्रश्न विचारत विरोधकांवर तुटून पडा असा सल्ला दिला होता.

उद्धव ठाकरेंच्या या प्रश्नाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुंबईतील बुस्टर डोस सभेत उत्तर दिलं आहे. बाबरीचा ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं, त्यावेळी शिवसेनेचा एकही नेता तिकडे हजर नव्हता असं फडणवीस म्हणाले.

"बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा तुम्ही कुठे होतात? हा देवेंद्र फडणवीस ढाचा पाडायच्यावेळेला तिकडे होता. जेलमध्ये गेलो, आम्ही लाठीगोळी खाण्याचं काम केलं. बाबरी पडली तेव्हा शिवसेनेतला एकही नेता तिकडे हजर नव्हता. बाबरीच्या खटल्यात 32 आरोपी होते त्यात एकही शिवसेनेचा नेता नव्हता", असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी बोलत असताना फडणवीसांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही शिवसेनेला लक्ष्य केलं. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. काही लोकांना वाटतं आपण म्हणजेच महाराष्ट्र आहे असं वाटतं, त्यांना मी नम्रपणे सांगतो तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र म्हणजे अठरापगड जातीच्या लोकांनी तयार झालेला महाराष्ट्र, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप मुंबईमध्ये पोलखोल अभियान चालवत आहे. मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेने केलेल्या भ्रष्टाचारावर या अभियानाच्या माध्यमातून बोट ठेवलं जात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं हे पोलखोल अभियान महत्वाचं मानलं जात आहे.

Related Stories

No stories found.