
बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर मी काम केलं आहे, त्याच विचारांवर काम करतो आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून घात होतो आहे असं मला शिवसेनेतले आमदार सांगत होते. मी त्यांना सांगितलं आपल्या प्रमुखांचा आदेश मानणं आपल्याला मानणं क्रमप्राप्त आहे. माझ्या शब्दाखातर लोक पक्षात होते. मात्र अडीच वर्षांपासून अनेक वाईट अनुभव आमदारांना आले असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. अब्दुल सत्तार यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मेळावा घेतला. त्यामध्ये ते बोलत होते.
माझ्या घरावर दगड मारायला सांगितलं होतं. मात्र एकाचीही हिंमत झाली नाही. मला मानणारे हजारो, लाखो लोक आहेत. मला त्या सगळ्या मध्ये पडायचं नाही. आज जे आमदार माझ्यासोबत आले आहेत त्या सगळ्यांची जबाबदारी मी घेतली आहे. मी आणि माझ्या सोबत आलेल्या आमदारांनी बंड केलेलं नाही आम्ही उठाव केला. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत जे काही करतो ते छातीठोकपणे करतो असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
शेवटची कॅबिनेट उद्धव ठाकरेंनी घेतली त्यात संभाजी नगर, धाराशिव ही नावं घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र ती कॅबिनेट बेकायदेशीर होती त्यामुळे आम्ही स्थगिती दिली आहे. आता आम्ही कॅबिनेट घेणार आणि कायदेशीरपणे हे नामांतर करणार. संभाजी नगर हा बाळासाहेबांच्या तोंडून निघालेला शब्द आहे. इतर धर्मीयांचा अपमान करणं ही बाळासाहेब ठाकरेंची संस्कृती नाही. आम्हीही सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जात आहोत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
आम्हाला गद्दार म्हटलं गेलं आणि वाट्टेल ती टीका केली गेली. आम्ही ती सहन केली. तसंच आम्ही अडीच वर्षे जो काही अन्याय महाविकास आघाडीत होत होता तो देखील सहन केला. पाडलेल्या आमदाराला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून बळ दिलं जात होतं. शिवसैनिकांवर केसेस होत होत्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला काहीही मिळालं नाही उलट शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं. आम्ही हा उठाव का केला? याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी केलं पाहिजे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेला वाचवण्यासाठी आणि शिवसैनिकांना वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला. आपले आमदार पुन्हा निवडून आले पाहिजेत ही काळजी मला होती. मला जे दुःख सांगत होते. मी पाचवेळा आमदारांचं म्हणणं घेऊन गेलो होतो मात्र माझं ऐकून पुढे काहीही केलं नाही. शिवसेना हा पक्ष आपला मुख्यमंत्री असताना नगरपंचायतीत चार नंबरवर गेला याकडे कुणी लक्षही दिलं नाही. आपल्या सत्तेचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जास्त होत होता याकडे दुर्लक्ष केलं असाही आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.