Bhagirath Bhalke: राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांच्याविरुद्ध गुन्हा; काय आहे प्रकरण?

Bhagirath Bhalke Pandharpur : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असलेल्या भालके, पेट्रोलपंप मालकासह चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा
Bhagirath Bhalke: राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांच्याविरुद्ध गुन्हा; काय आहे प्रकरण?

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांच्या विरोधात डिझेल खरेदी प्रकरणात अपहार केल्याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार भालकेंसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यात पेट्रोलपंप मालकाचाही समावेश आहे.

भ्रष्ट्राचार, घोटाळ्याच्या आरोपांनी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. मागील वर्ष-दीड वर्षांपासून सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी जोरदार शाब्दिक धुश्मचक्री होताना दिसत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे अडचणीत आले आहेत.

भगीरथ भालके यांच्याविरुद्ध अपहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर भालके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने या विषयाची स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे.

डिझेल खरेदी अपहार प्रकरणात कारखान्याचे सभासद विलास शिवाजी पाटील यांनी न्यायालयात तक्रार केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार भगीरथ भालके, तत्कालीन कारखान्याचे कार्यकारी संचालक बाळासाहेब कर्पे, सरकोली येथील पेट्रोल पंप मालकासह चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मालकीचा पेट्रोल पंप असतानाही कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके व तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक बाळासाहेब कर्पे यांनी सरकोली येथील भैरवनाथ पेट्रोल पंपावरुन कारखान्याच्या नावे पावत्या तयार करुन १६ हजार लिटर डिझेलची खरेदी केल्याचं दाखवलं. त्यातून ८ लाख ३६ हजार ५३ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार विलास पाटील (रा.रोपळे ता.पंढरपूर) यांनी न्यायालयात केली होती.

पाटील यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाने सर्व पुराव्याची पडताळणी करुन भालके व कर्पे यांच्यासह पंपाचे मालक व व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in