‘छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला’, प्रसाद लाडांच्या विधानाने वादाला खतपाणी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानांमुळे निर्माण झालेलं वादंग अद्यापही संपलेलं नाही. त्यातच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबद्दल चुकीचं विधान केलं आहे. लाड यांच्या या विधानामुळे संपूर्ण वादाला खतपाणी मिळाल्याचंच दिसत असून विरोधकांनी यावरून भाजपची कोंडी केली आहे.

भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जुन्या काळातले आदर्श म्हटले, तर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सावरकरांनी ब्रिटिशांकडे केलेल्या अर्जांवर भूमिका मांडतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रांचा उल्लेख करत त्याला माफीनामा म्हणणार का? असं विधान केलं होतं.

या दोन्ही विधानावरून महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. विरोधकच नव्हे, तर भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि भाजपकडून राज्यसभा खासदार राहिलेले छत्रपती संभाजीराजे भोसले हेही आक्रमक झालेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी महाराष्ट्रात जोर धरत असतानाच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या विधानामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झालीये.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘कोण तो राज्यपाल.. तो कधी मोठा नव्हताच…’, उदयनराजेंना संताप अनावर

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? प्रसाद लाड काय म्हणाले?

स्वराज्यभूमी कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाच्या आयोजनाची माहिती भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दिली. यावेळी प्रविण दरेकरही उपस्थित होते. प्रसाद लाड म्हणाले, “स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी, असं तु्म्ही विचाराल, तर हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात हा झाला”, असं विधान प्रसाद लाड यांनी केलं.

ADVERTISEMENT

प्रसाद लाड पुढे म्हणाले, “रायगडावर त्यांचं बालपण गेलं. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे ती सुरूवात कोकणातून झाली”, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

“स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या”, राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला सल्ला

प्रसाद लाड यांच्या विधानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसनं शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला उपरोधिक सल्ला दिलाय. “भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या”, असं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलंय.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोण कोणत्या वादांमुळे चर्चेत राहिले?

“शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे”, असा टोलाही राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला लगावला आहे.

छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का? -अमोल मिटकरी

“भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात आज नवीन इतिहास मांडला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेले.’ परत एकदा इतिहासाशी छेडछाड झाली आहे. भाजपने छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का?”, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जन्म ठिकाण : प्रसाद लाड यांनी मागितली माफी

“छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ज्यापद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करतेय. त्याचा मी निषेध करतो. ज्या भावनेतून जो कार्यक्रम आम्ही केलाय, स्वराज्य कोकणभूमी त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलं होतं आणि माझी चुक देखील मी सुधरली होती. व्हिडीओत पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, स्वराज्याची स्थापनाही कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झाला, असं माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादवरांवांनी देखील म्हटलं. ते देखील मीडियामध्ये आलेलं आहे. परंतु तरीदेखील छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्यानं करतं. त्याचा मी निषेध करतो. माझ्या शब्दामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो”, असा खुलासा प्रसाद लाड यांनी केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT