'व्हीप'मुळे गेम झाला अन् सत्ताधारी काँग्रेसचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवारच पडला; १९६९ मध्ये काय झालं होतं?

history of Presidential Elections : १९६९ साली झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत घडली होती कलाटणी देणारी घटना
Neelam Sanjiva Reddy
Neelam Sanjiva ReddyGoogle

राष्ट्रपती पदाची निवडणूक होऊ घातली आहे. सत्ताधारी एनडीएकडे बहुमत जास्त आहे. त्यामुळे एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित आहे. आतापर्यंतच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पाहिल्या तर सत्ताधारी पक्षाचे उमेदवार विजयी झालेत. पण, याठिकाणी एक निवडणूक अपवाद ठरतेय.

या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा उमेदवार पराभूत झाला होता. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आपल्याच पक्षाविरोधात मत दिलं होतं. देशात पहिल्यांदाच असं झालं होतं की अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. तो उमेदवार नेमका कोण होता? आणि सत्ताधाऱ्यांनी आपल्याच उमेदवाराच्या विरोधात मत का दिलं? त्यासाठी आपण हा जुना किस्सा पाहुयात.

सालं होतं १९६९. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन यांचं कार्यकाळ संपण्यापूर्वीच निधन झालं होतं. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी पुन्हा निवडणुका लागल्या होत्या. यावेळी देशात काँग्रेसचं सरकार होतं आणि इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी १० जुलैला बंगळुरूला काँग्रेस संसदीय दलाची बैठक झाली. यामध्ये जगजीवन राम यांचं नाव पुढे आलं. पण, काँग्रेस सिंडीकेटला निलम संजीव रेड्डी यांना राष्ट्रपती बनवायचं होतं.

शेवटी निलम संजीव रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्यांनी निवडणूक आयोगाकडं उमेदवारी अर्ज दाखल केला त्याचवेळी वराहगिरी व्यंकटगिरी यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

प्रत्यक्ष मतदान करण्याची वेळ आली तेव्हा इंदिरा गांधींनी काँग्रेसच्या लोकसभेतील संसदीय नेत्या या नात्यानं प्रेसिडेंशियल एंड वाइस प्रेसिडेंशियल अ‌ॅक्टचा हवाला देत पक्षाच्या सदस्यांना व्हीप जारी करण्यास नकार दिला. परिणामी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निलम संजीव रेड्डी पराभूत झाले. अपक्ष उमेदवार वराहगिरी व्यंकटगिरी यांना काँग्रेसच्या १६३ खासदारांनी मत दिलं होतं. गिरी यांना काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यातून देखील बहुमत मिळालं होतं.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आपल्याच पक्षाविरोधात भूमिका का घेतली होती? -

इंदिरा गांधी १९६६ मध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान झाल्या. त्या पंतप्रधान असल्या तरी पक्षावर काही बड्या नेत्यांचं वर्चस्व होतं. यामध्ये कामराज, मोरारजी देसाई, निजलिंगप्पा यांसारख्या बड्या नेत्यांचा समावेश होता. त्यांना काँग्रेस सिंडीकेटही म्हटलं जात होतं.

इंदिरा गांधी या फक्त गुंगी गुडीया आहे, असं त्यावेळी अनेक राजकीय जाणकार म्हणायचे. इंदिरा गांधींनाही त्यांच्या दैनंदिन कामकाजात या सिंडीकेटचा हस्तक्षेप होऊ नये असं वाटायचं. त्यातूनच त्यांचे सिंडीकेटमधील नेत्यांसोबत खटके उडायचे.

या सिंडीकेटपासून दूर कसं राहायचं याचं नियोजन त्या आखत होत्या. इतक्यात तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसैन यांचा मृत्यू झाला आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक लागली. इंदिरा गांधींना स्वतःचं वर्चस्व दाखवून देण्याची संधी मिळाली. त्यामुळेच इंदिरा गांधींनी स्वतःच्या पक्षाविरोधात जाण्याची भूमिका घेतल्याचं बोललं जातं. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता.

राष्ट्रपती पदाची निवडणूक कधी? -

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आलाय. त्यांच्याजागी नवीन राष्ट्रपती निवडले जाणार आहेत. त्यासाठी भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे संयुक्त विरोधी पक्षाने यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली आहे.

द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. सध्या एनडीएकडे बहुमत आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. असं झालं तर मुर्मू या स्वतंत्र भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असणार आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in