
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलै रोजी संपणार आहे. त्याच अनुषंगाने देशाच्या निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या निवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या १८ तारखेला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक आहे तर २१ तारखेला भारताला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. येत्या १० तारेखेला देशात राज्यसभेची निवडणूक होणार आहे तर राज्यात २० तारखेला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा संपुर्ण कार्यक्रम
* १५ जून रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसुचना निघणार आहे.
* २९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
* ३० जून रोजी अर्जाची छाननी होवून २ जुलै रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असणार आहे.
* निवडणूक बिनविरोध झाल्यास २ जुलै रोजीच देशाला नवीन राष्ट्रपती मिळणार आहेत.
* निवडणूक बिनविरोध न झाल्यास १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण करतं मतदान?
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्वसामन्य लोकांना मतदान करता येत नाही. या निवडणुकीमध्ये सर्व निवडून आलेले आमदार-खासदार मतदान करु शकतात. मतदारांच्या एकूण मतांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे खासदार आणि आमदारांच्या मतांचे वेटेज प्राप्त करणारा उमेदवार भारताचा राष्ट्रपती होतो.
राष्ट्रपती पदासाठी भाजप कोणता उमेदवार देतं या चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप यंदा महिला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. आणि मुख्य म्हणजे त्या आदिवासी महिला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर ही निवडणूक बिनविरोध नाही झालीतर ही निवडणूक ही रंजक होण्याची शक्यता आहे.