"उद्धव ठाकरेंनी हे आधीच सांगितलं असतं, तर बाहेरून पाठिंबा देण्याची आमची तयारी होती"

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही फुटू शकतात; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली भीती
"उद्धव ठाकरेंनी हे आधीच सांगितलं असतं, तर बाहेरून पाठिंबा देण्याची आमची तयारी होती"

एकनाथ शिंदे हे काँग्रेस-राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं सांगत असले, तरी ते खोटं आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. अनपेक्षितपणे संधी आली, पण त्यांना संधी मिळाली नाही, असं सांगत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील राजकीय बंडाळीवर भाष्य केलं.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जाऊन नागरिकांना संबोधित करायला हवं होतं, अशी भूमिका मांडली.

चव्हाण म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संभ्रमात टाकणारा होता. त्यात काहीही स्पष्टपणा नव्हता. पक्षांतरबंदी कायद्याबद्दल न्यायालयाला निर्णय घेता आला असता, तोही घेतला गेला नाही. बरीचशी अनिश्चितता आहे. ११ जुलै रोजी पुन्हा या प्रकरण ऐकू असं न्यायालयाने सांगितलं. त्यात आता न्यायालयाने निर्णय बदलला आणि आता विश्वासदर्शक ठराव घ्या नंतर बदल करायचा असेल, तर करू, असं न्यायालयाने म्हटलं. विचित्र प्रकारचा निर्णय दिलेला आहे. ही सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा नव्हती."

"माझ्यामते उद्धव ठाकरे यांनी सभागृहात यायला हवं होतं. आपली बाजू मांडायला पाहिजे होती. मग मतदान घ्यायचं नसतं, तर राजीनामा द्यायला पाहिजे होता. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांची बाजू विधीमंडळाच्या माध्यमातून कळाली असती."

"विरोधी पक्षनेते बोलले असते. इतर पक्षाच्या नेत्यांना बोलायची संधी मिळाली असती. आम्ही हे सरकार का स्थापन केलं होतं, हे काँग्रेस राष्ट्रवादीला सांगता आलं असतं. दोन चार तास सभागृह चाललं असतं आणि त्यानंतर जो निर्णय घ्यायचा होता, तो घेतला असता, तरी चाललं असतं."

"त्यांची संघर्ष करण्याची इच्छा राहिलेली नाही. त्यांनी जे कारण सांगितलं की, रक्तपात होईल वगैरे, हे सगळं खोटं आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर लढाई राहिलीच नव्हती. हा निर्णय अपेक्षितच होता. माझी ही नाराजी नाहीये. ही वैयक्तिक भावना आहे. मला असं वाटतं की, महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना पाठिंबा दिला. त्यांना स्वीकारलं. त्या जनतेला सांगायला हवं होतं. फेसबुक लाईव्ह करणं आणि विधिमंडळात बोलणं यात फरक आहे. विधिमंडळात बोललेलं ऐतिहासिक रेकॉर्ड राहतं. ते करायला पाहिजे होतं. त्यांना विधिमंडळाची परंपरा काही जास्त माहिती नव्हती."

"शिवसेनेला बाहेरून पाठिंबा द्यायला उशीर झालेला आहे. एकनाथ शिंदेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर राग काढला, तो काही खरा नव्हता. खरं कारण होतं की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री न होता मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं, तसंच यावेळी घडेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी निवडणुकीची सगळी व्यवस्था केली होती."

"जेव्हा संधी येईल तेव्हा ती आपल्याला मिळेल आणि आपण मुख्यमंत्री होऊ अशी त्यांची अपेक्षा होती. ते घडलं नाही, कारण शरद पवारांनी अशी भूमिका घेतली की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बरेच ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना एखाद्या कनिष्ठ माणसाच्या हाताखाली काम करणं अवघड जाईल, अशी शरद पवारांची भूमिका होती," असं राजकीय चव्हाण यांनी सांगितलं.

"इतक्या मोठ्या प्रमाणात माणसं नाराज आहेत, याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्यामुळे त्या शॉकमधून ते बाहेरच निघाले नाहीत. सारखं म्हणत राहिले की, माझ्या माणसांनी दगा दिला. खाली काय चाललं होतं, याचा त्यांना अंदाज आला नाही. एकनाथ शिंदे आणि इतके आमदार का गेले? हे नंतर चर्चिलं जाईल, पण हा नेतृ्त्वाचाही प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी आधीच जर म्हटलं असतं की, काँग्रेस- राष्ट्रवादीमुळे माझे लोक नाराज आहेत. तर ते आम्ही मान्य केलं असतं. भाजपला थांबवण्यासाठी आमची ती तयारी होती. बाहेरू पाठिंबा देण्याची," असं चव्हाण म्हणाले.

"काँग्रेसमधील स्लीपर सेल झाकले गेले, असं मी म्हणणार नाही. निकालात फारच संदिग्धता आहे. ११ जुलैला काय होणार, कारण न्यायालयाने सांगितलं की आम्ही पुन्हा तुमचं ऐकू; ते कोण मांडणार काही माहिती नाही. मंत्रिमंडळ ते स्थापन करणार असतील आणि काहीजणांना संधी दिली, तर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही पक्षातून (काँग्रेस आणि राष्ट्रवादी)," असं विधान त्यांनी केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in