खासदारांचा विशेषाधिकार संजय राऊतांची अटक टाळणार?, हक्कभंग म्हणजे काय?

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता आहे. सकाळी सात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी संजय राऊतांच्या घरी आहेत.
खासदारांचा विशेषाधिकार संजय राऊतांची अटक टाळणार?, हक्कभंग म्हणजे काय?

मुंबई: शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक होण्याची शक्यता आहे. सकाळी सात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी संजय राऊतांच्या घरी आहेत. संजय राऊत कारवाईला सहकार्य करत नसल्याची माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली आहे. तर संसदेचे अधिवेशन सुरु असताना तुम्ही मला अटक करु शकत नाही असे संजय राऊत म्हणत आहेत. नक्की राज्यघटनेमध्ये संसद सदस्याला काय अटकेपासून काय संरक्षण आहे?, खासदाराचा विशेषाधिकार म्हणजे काय? हे आपण जाणून घेऊयात.

संसद सदस्याला राज्यघटनेमध्ये विशेष संरक्षण देण्यात आले आहे. त्याचे कारण असे की देशाच्या हितासाठी कायदे तयार करत असताना सदस्यावरती कोणताही दबाव येणार नाही. जर एखाद्या सदस्याची सभागृहात केलेली वक्तव्ये वादग्रस्त ठरली तरी त्यावर कारवाई करता येत नाही. आमदार आणि खासदार लोकप्रतिनिधी असतात म्हणून त्यांना काम करण्यासाठी काही विशेषाधिकार देण्यात आलेले आहेत.

राज्यघटनेतील कोणत्या कलामानुसार सदस्यांना संरक्षण?

भारतीय राज्यघटनेतील कलम 105 आणि कलम 194 नुसार सदस्यांना विशेषाधिकार देण्यात आले आहेत. कलम 105 लोकसभा-राज्यसभा सदस्यांसाठी तर कलम 194 विधानसभा-विधान परिषद सदस्यांसाठी आहेत.

सभागृहातील सदस्यांना कोणत्या प्रकारचे विशेषाधिकार असतात?

* अटकेपासून संरक्षण- दिवाणी खटल्यांबाबतीत सभागृहातील कोणत्याही सदस्याला सभागृहाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी 40 दिवस किंवा सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर 40 दिवस अटक करण्यात येत नाही, तसेच जर एखादा सदस्य सभागृहातील कोणत्या समितीचा सदस्य असेल तर त्याला समितीच्या बैठकी अगोदर 40 दिवस आणि बैठकीनंतर 40 दिवस अटक करण्यात येत नाही.

अटकेपासून संरक्षण हे फक्त दिवाणी खटल्यांपासून असते, फौजदारी खटल्यांपासून नाही. अशा प्रकरणात जर सदस्याला अटक करायची झाल्यास अगोदर सभापतींना माहिती द्यावी लागते. महत्त्वाचं म्हणजे सदस्याला सभागृहात अटक करता येत नाही.

साक्षीदार होण्यापासून सुटका- सभागृहाचे कामकाज सुरु असताना सदस्याला सभापतींच्या परवानगीशिवाय कोर्टात बोलवता येणार नाही. तसेच कोणत्याही कोर्टाच्या कामात साक्षीदार होण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे.

सदस्याला कोणते सामूहिक विशेषाधिकार असतात?

* सभागहातील चर्चा व कामकाज याची माहिती प्रकाशीत करण्याच अधिकार सभागृहाकडे असतो. कोणती गोष्ट कामकाजात समाविष्ट केली जावी याचा अधिकार सभापतींना असतो. सभागृहाचे कामकाज सुरु असताना नेत्यांची अनेक भाषणं होत असतात त्यामधिल कोणता भाग रेकॉर्डवरती ठेवायचा याचा अधिकार सभापतींना असतो. विशेष म्हणजे जो भाग कामकाजातून वगळलेला आहे तो माध्यमांना छापता येत नाही. तसे झाल्यास तो विशेषाधिकाराचा भंग मानला जातो.

* विशेषाधिकाराचा भंग झाल्यास कोणत्याही व्य्क्तीच्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकार सभापतींकडे असतो.

* सभागृहाच्या कामकाजात अडथळा येऊ नये म्हणून सदस्यांना विशेष अधिकार दिलेले असतात जर या अधिकारांचा भंग झाला तर तो विशेषाधिकारांचा भंग मानला जातो.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in