
मनसे (MNS ) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे २१ मे रोजी पुण्यात (Pune) सभा घेण्याची शक्यता आहे. या सभेत राज तोफ पुन्हा धडाडण्याची शक्यता आहे. २ एप्रिलला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनी सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरेंनी शरद पवारांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. २ एप्रिलपासून त्यांच्या एकूण तीन सभा झाल्या आहेत. आता चौथी सभा ते पुण्यात घेणार आहेत. ही सभा २१ मे रोजी होण्याची शक्यता आहे.
मुंबई तकला दिलेल्या माहितीत राज ठाकरे हे आता २१ मे रोजी सभा गेणार असून त्यासाठी पुण्यातील भिडे पुलाशेजारी असलेल्या नदीपात्राचं ठिकाण निवडण्यात आलं आहे. मनसेच्या नेत्यांकडून आणि पोलिसांकडून सभास्थळाची पाहणी केली जाईल. या सभेला काय नियम आणि अटी लावायच्या? याचा निर्णय पोलीस घेतील असंही मनसेने म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता पुण्यात जी सभा घेतील त्या सभेत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाळासाहेबांचं सोंग घेतलेले मुन्नाभाई सध्या फिरत आहेत असं उद्धव ठाकरेंनी १४ मे रोजी घेतलेल्या सभेत म्हटलं होतं. तसंच राज ठाकरेंची खिल्लीही उडवली होती. या खिल्लीला राज ठाकरे उत्तर देणार का? आणि ते नेमकं काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
"मला मध्यंतरी एका शिवसैनिकाने विचारलं, साहेब तुम्ही तो लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? मी त्याला विचारलं संबंध काय? लगे रहोचा... मी थोडासा पाहिलाय. तर तो मला म्हणाला की त्यात नाही का संजय दत्तला गांधीजी दिसतात. गांधीजी त्याच्याशी बोलतात, मग तो गांधीगिरी करायला लागतो. मी म्हटलं हां मग... ? तर तो मला म्हणाला की तशी एक केस आहे आपल्याकडे. मी म्हटलं अशी कोणती केस? तर तो म्हणाला अहो ती नाही का? ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. "
"शाल घेऊन फिरतात. कधी मराठीच्या नादाला तर कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. मी त्याला म्हटलं की अरे त्या सिनेमातला मुन्नाभाई लोकांचं भलं तरी करत होता. हा कुठला मुन्नाभाई काढलास? तर तो मला म्हणाला तुम्ही त्या पिक्चरचा शेवट नाही पाहिला. त्यात शेवटी त्या संजय दत्तला कळतं की आपल्या डोक्यात केमिकल लोच्या झाला आहे. तर ही केमिकल लोच्याची केस आहे. असे मुन्नाभाई फिरत आहेत फिरूद्या.. ज्यांना कुणालाही अयोध्येला जायचं आहे जाऊद्या."
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसाच्या पुणे दौर्यावर येत आहे.आम्ही २१ ते २७ मे दरम्यान सभेचं पुण्यात नियोजन करत आहोत. नेमकी सभा कुठे होणार,त्याबाबत राज ठाकरे उद्या जाहीर करतील, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी दिली.यावेळी शहराध्यक्ष साईनाथ बाबर,वनिता वागसकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बाबू वागसकर यांनी हेदेखील सांगितलं की राज ठाकरे यांच्या मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद या ठिकाणी सभा झाल्या आहेत.त्या सभांमध्ये अनेक मुद्यांना हात घातला आहे.यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये प्रचंड उत्साह असून त्यापैकी एक म्हणजे राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या दर्शनाला जाणार आहे. त्यांच्यासोबत आमच्यासह राज्यातील विविध भागातील मनसैनिक जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही आजपासून अयोध्येत जाण्यासाठी नोंदणी सुरू केली आहे. या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असून पश्चिम महाराष्ट्रा मधून जवळपास ८ ते १० हजार नागरिकांची नोंदणी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.