
शरद पवार यांनी जातीयवाद पसरवला आहे. राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असा आरोप करत मनसे नेते राज ठाकरे यांनी शरद पवार हे फक्त त्यांच्या भाषणात शाहू, फुले, आंबेडकर हीच नावं घेतात छत्रपती शिवरायांचं नाव घेत नाहीत असं म्हणत सुनावलं होतं. राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांनी औरंगाबादमध्ये उत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
काय म्हणाले आहेत शरद पवार?
"परवा कुणीतरी एका नेत्याने मुंबईत भाषण दिलं. भाषणात ते म्हणाले की शरद पवार फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांचंच नाव का घेतात? माझी त्यांना विनंती आहे की महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या. प्रबोधनकार ठाकरे हे विचारवंत महाराष्ट्रात होऊन गेले. प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राचं सामाजिक परिवर्तन यासंबंधीचं अतिशय उत्तम लिखाण केलं आहे. ते जर वाचलं तर अशा प्रकारचे प्रश्न कुणी विचारणार नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांच्यातली प्रत्येक व्यक्ती अत्यंत महत्त्वाची आहे.
१२ एप्रिलला राज ठाकरेंनी ठाण्यात उत्तरसभा घेतली होती. या उत्तरसभेत त्यांनी शरद पवारांवर कडाडून टीका केली. शरद पवार हे जातीयवाद पसरवत आहेत असा गंभीर आरोप त्यांनी या भाषणात केला. त्यानंतर लगेचच म्हणजेच १३ एप्रिललाही शरद पवारांनी त्यांना उत्तर दिलं होतं. आज पुन्हा एकदा शरद पवारांनी राज ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
१३ एप्रिलला काय म्हणाले होते शरद पवार?
"फुले असो, आंबेडकर असो किंवा शाहू महाराज असतील. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असीम आस्था असलेले हे घटक आहेत. महाराजांचा आदर्श लक्षात घेऊन आपला हातातील सत्तेचा वापर कसा करावा अशी तिघांची भूमिका राहिलेली आहे. तिघांचा उल्लेख करणं हा शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्याचाच भाग आहे. हे मला मुद्दाम सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतीबद्दल काव्यातून पहिल्यांदा कुणी लिहिलं असेल, तर ते महात्मा फुलेंनी लिहिलं." असं सगळं शरद पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं. एवढंच नाही तर राज ठाकरेंनी प्रबोधनकारांच्या विचारसरणीचा अभ्यास करावा आणि इतिहास जाणून घ्यावा असंही सांगितलं आहे.