
Rajiv Gandhi Assassination: चेन्नई: माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या एजी पेरारिवलनची (AG Perarivalan) बुधवारी 31 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुटका करण्यात आली. पेरारिवलन याची तुरुंगात चांगली वागणूक असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता.
त्याच्या सुटकेनंतर जेव्हा 'आज तक'ने त्याच्याशी संवाद साधला तेव्हा पेरारिवलन म्हणाला की, 'दीर्घ लढ्यानंतर मला न्याय मिळाला आहे आणि आता त्याला मोकळा श्वास घ्यायचा आहे.' जाणून घ्या तब्बल 31 वर्षानंतर तुरुंगातून सुटल्यानंतर पेरारिवलन नेमकं काय-काय म्हणाला.
प्रश्न. तुम्ही 31 वर्षांची लढाई जिंकली आहे, निकाल आल्यावर तुमच्या मनात पहिली गोष्ट काय आली?
पेरारिवलन: मला सगळ्यात आधी हेच वाटले की शेवटी सत्याचाच विजय झाला. या निर्णयामुळे माझा आईला खूप दिलासा मिळाला आहे.
प्रश्न. गेली अनेक वर्षे तुमच्यावर फाशीची टांगती तलवार होती. भारतात फाशीच्या शिक्षेची तरतूद असावी का?
पेरारिवलन: 1998 ते 2014 पर्यंत माझ्यावर फाशीची टांगती तलवार कायम होती. कोणत्याही देशात फाशीच्या शिक्षेची तरतूद नसावी असे माझे मत आहे. सुमारे 140 देशांमध्ये यावर बंदी आहे. मला आशा आहे की ते भारतातही ते होईल. लवकरच यामध्ये बदल केले जातील.
प्रश्न. ज्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला त्यांना तुम्ही काय म्हणाल?
पेरारिवलन: ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे आभार मानायला शब्द नाहीत. कारण मी हे केले तर ती केवळ औपचारिकता राहील. त्यांच्याशिवाय ही लढाई जिंकणे शक्यच नव्हते. त्यांनी उघडपणे सामान्य माणसाची बाजू घेतली. तो लढा होता सामान्य माणसाचा, ज्याला अडकवलं गेलं होतं.
प्रश्न. न्यायाला उशीर होणे हे न्याय नाकारल्यासारखे आहे असे म्हणतात?
पेरारिवलन. ही एक प्रदीर्घ कायदेशीर लढाई होती.
प्रश्न. अजूनही 6 जणांची सुटका व्हायची आहे?
पेरारिवलन: मी कोर्टाच्या ऑर्डरची पूर्ण प्रत वाचलेली नाही. पण मला आशा आहे की, या निकालामुळे त्या लोकांना देखील मदत होईल. केवळ त्यांनाच नाही तर अशा संघर्षाचा सामना करणाऱ्या प्रत्येक कैद्याला मदत होईल.
प्रश्न. आता तुमचे पुढचे पाऊल काय असेल?
पेरारिवलन: मी काय करेल हे मला माहीत नाही. माझ्याकडे भविष्यासाठी कोणतीही योजना नाही. मी बराच काळ कायदेशीर लढाईत अडकलो होतो. मला आनंद होण्याचे एकमेव कारण म्हणजे माझी सुटका झाली आहे. आता मला मोकळा श्वास घ्यायचा आहे.
पेरारिवलन याला शिक्षा का झाली होती?
देशाचे माजी पंतप्रश्नधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथे हत्या करण्यात आली होती. त्याच प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून पेरारिवलनला 11 जून 1991 रोजी अटक करण्यात आली होती.
पेरारिवलनने हत्येसाठी वापरलेल्या आत्मघातकी जॅकेटमध्ये वापरलेल्या दोन 9-व्होल्ट बॅटरी पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पेरारिवलनने ही बॅटरी हत्येचा मुख्य सूत्रधार शिवरासन याला विकत घेतल्याचे न्यायालयात सिद्ध झाले होते.
घटनेच्या वेळी पेरारिवलन 19 वर्षांचा होता. पेरारिवलन याने तुरुंगात असतानाही शिक्षण सुरू ठेवले. तसेच त्याने चांगले गुण मिळवून अनेक पदव्याही मिळवल्या आहेत.
सीएम स्टॅलिन यांनी पेरारिवलन यांच्या आईशी केली चर्चा
दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासोबत पेरारिवलनची आई अर्पुथम्मल यांनी फोनवरुन चर्चा केली. यावेळी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अनेक निराशेनंतर अखेर एक आनंदाची बातमी आल्याचे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी कुटुंबीय म्हणून येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्या नक्की आल्या पाहिजे, असं म्हटलं आहे.