
मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या मतदानात भाजपने आक्षेप घेतलेल्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत निवडणूक आयोगाने रद्द ठरवला आहे. ज्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण या निवडणुकीत प्रत्येक मत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशावेळी सुहास कांदे यांचं मत रद्द होणं हे आता शिवसेनेला किती धक्का देणारं ठरणार हे थोड्या वेळातच हा समजणार आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर सुहास कांदे यांना एक प्रकारे झटका बसला आहे. या निकालानंतर 'मुंबई तक'ने सुहास शिंदे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली बाजू मांडताना त्यांनी आपण काहीही चूक केली नसल्याचा दावा केला आहे. तसेच याबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन आपण कोर्टात जाणार असल्याचंही कांदे यांनी म्हटलं आहे.
पाहा सुहास कांदे नेमकं काय म्हणाले:
'मला आतापर्यंत ती प्रतच मिळालेली नाही. याबाबत आमच्या पक्षाच्या वरिष्ठांना पण विचारलं, आमच्या लिगल टीमला पण विचारलं. कोणालाही ती प्रत मिळालेली नाही. आपण म्हणताय की, मतमोजणी सुरु झाली. पण ती देखील सुरु झालेली नाही.'
'माझ्याकडून काहीही असं घडलेलं नाही. मतदान केल्यानंतर मतपत्रिका मी फोल्ड केली होती. पहिल्या पसंतीचं दुसऱ्या पसंतीचं मत दिल्यावर. त्यानंतर मत मी आमच्या प्रतोदला दाखवलं आणि पेटीत टाकलं.' असं सुहास कांदे यावेळी म्हणाले.
'असं कसं दिसेल माझं मत.. कागद एवढा छोटा.. सिंगल पेज इतकं आणि कसं दिसेल ते? मला तर शंकाच आहे. मी जर ते पेज फोल्ड केलं होतं तर कसं दिसेल ते?' असं म्हणत सुहास शिंदे यांनी या निकालाबाबत शंका व्यक्त केली आहे.
'माझ्याकडून काहीही घडलेलं नाही. असं जर माझ्याविरोधात निकाल असेल तर मी कोर्टाचा दरवाजा वरिष्ठांना विचारुन त्यांची पूर्व परवानगी घेऊन मी ठोठावेन.' असं म्हणत आपण कोर्टात जाणार असल्याचंही सुहास कांदे यांनी सांगितलं आहे.
'मी आमदार आहे.. मी कायद्याचा अभ्यास केलेला आहे. मला कळतं कायदा काय आहे ते. तो काही विषय नाही.' असंही सुहास कांदे यावेळी म्हणाले.