
मुंबई महापालिकेत रामलल्लाच्या आशीर्वादाने रामराज्य येईल असं वक्तव्य महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी अयोध्येत केलं आहे. आदित्य ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी ते शरयू नदीची आरतीही करणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी अयोध्येत पोहचल्यावर पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली तसंच हा आमचा राजकीय दौरा नाही तर तीर्थ यात्रा आहे असंही सांगितलं. तसंच राज ठाकरेंच्या मुद्द्यावर बोलणं त्यांनी टाळलं आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
शिवसेनेचं हिंदुत्व सगळ्यांना माहिती आहे. आमचं राजकारण आणि हिंदुत्व स्पष्ट आहे. प्राण जाये पर वचन न जाय़े हे आमचं हिंदुत्व आहे. जनतेला दिलेलं वचन पाळणं हे आमचं हिंदुत्व आहे. आम्ही राजकारणासाठी नाही तर तीर्थयात्रा म्हणून या ठिकाणी आलो आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की रामलल्लाच्या आशीर्वादाने मुंबई महापालिकेत रामराज्य येईल.
आम्ही रामाचे भक्त म्हणून आलो आहोत. राजकारण आणि निवडणुकांचा काही संबंध नाही. भक्ती आणि शक्ती आमच्यासाठी दोन नाही एकच आहे. आमची भक्ती हीच आमची शक्ती आहे. हाच आमचा धर्म आहे असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश करण्यापासून विरोध करण्यात आला. त्याबाबत विचारण्यात आलं तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले की, ''मी इतर कुणाची काय भूमिका आहे ते पाहणार नाही. बृजभूषण सिंह यांच्याशी माझं फोनवरून बोलणं झालं. कोण कोणाचं स्वागत कसं करतं, कोण कोणाला विरोध करतं या पेक्षा मंदिर निर्माण चांगल्या पद्धतीने व्हावं ही आमची इच्छा आहे.''
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला हे सांगितलं आहे की ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार आहेत, तसंच त्यांना पत्रही पाठवणार आहेत. अयोध्या या पावनभूमीत महाराष्ट्र सदन उभं रहावं यासाठी हा पत्रव्यवहार आणि फोन संवाद होणार आहे. किमान १०० खोल्यांचं महराष्ट्र सदन घडवावं असं आम्हाला वाटतं आहे. महाराष्ट्रातून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात त्यांना राहण्यासाठी ही चांगली जागा निर्माण होईल असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे. आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत, युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई हीदेखील उपस्थित होते.