रवी राणा vs बच्चू कडू संघर्ष शिगेला! मुख्यमंत्री शिंदेंना दिला वेगळा विचार करण्याचा इशारा

bacchu kadu vs ravi rana : रवी राणांनी केलेल्या आरोपावरून बच्चू कडूंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे, तर दुसरीकडे राणांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरून कडूंविरुद्ध गुन्हा दाखल झालाय...
eknath shinde, bacchu kadu, ravi rana
eknath shinde, bacchu kadu, ravi rana

राज्यभरात गाजलेल्या आणि चर्चिल्या गेलेल्या '५० खोके एकदम ओके' घोषणेवरूनच आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात राजकीय संघर्षाची ठिणगी पडलीये. राणांनी केलेल्या आरोपावरून बच्चू कडू यांनी दंड थोपटलेत. बच्चू कडूंच्या 'प्रहार'चे कार्यकर्तेही आक्रमक झालेत. दुसरीकडे राणांच्या 'युवा स्वाभिमान पार्टी'चे कार्यकर्तेही जशास तसं उत्तर देण्याची भाषा करू लागलेत. याच मुद्द्यावरू बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंनाही इशारा दिलाय.

सत्ताधारी बाकांवरील दोन आमदारांमध्ये सध्या जोरदार जुंपलीये. आमदार रवी राणा आणि प्रहारचे बच्चू कडू. दोघांमधील वाद चव्हाट्यावर येण्यास कारण ठरलंय गुवाहाटी आणि खोके. रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करताना ५० खोके घेतल्याचा आरोप केला.

बच्चू कडूंनी गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला. रवी राणांनी केलेल्या आरोपांवर सुरूवातीला बच्चू कडूंनी मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) यांनाही यात भूमिका मांडण्याचं आवाहन केलं होतं.

मात्र, त्यानंतर आता दोघांमधील वाक् युद्ध वाढलंय. संतापलेल्या बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणांविरुद्ध दंड थोपटले. 'एका बापाची औलाद असेल, तर रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत', असं आव्हान कडूंनी राणांना दिले.

१ नोव्हेंबरला व्हिडीओ येणार; बच्चू कडूंचा शिंदेंनाही इशारा

7 ते 8 आमदार माझ्या संपर्कात असून, रवी राणा यांनी केलेल्या आरोपामुळे ते नाराज आहेत. १ नोव्हेंबरपर्यंत रवी राणांनी पुरावे दिले नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं नाही, तर आम्ही वेगळा विचार करू', असा इशारा बच्चू कडूंनी रवी राणांबरोबरच एकनाथ शिंदेंनाही दिलाय.

'1 नोव्हेंबरला राणांच्या बैठकीतले व्हिडीओ प्रसिद्ध करणार आहे. एक तारखेला ट्रेलर असेल, त्यानंतर १५ दिवसांनी चित्रपट पूर्ण होईल. षडयंत्र कसं रचलं जातंय ते समोर येईल. या सगळ्यात माझी राख झाली, तरी माझ्याविरोधात झालेल्या आरोपांबद्दल मी पेटणार. मला मंत्री पदाशी काही देणं-घेणं नाही", असं बच्चू कडू म्हणालेत.

eknath shinde, bacchu kadu, ravi rana
Bacchu Kadu : ५० खोक्यांवर CM शिंदेंनी ५ दिवसांत बोलावं, अन्यथा १२ आमदार संपर्कात!

रवी राणांची प्रतिकात्मक तिरडी यात्रा

बच्चू कडू यांच्यावर आरोप केल्यानंतर सोलापूरमध्ये आक्रमक झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रवी राणा यांची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढली. अमरावतीत जाऊन आम्ही रवी राणांच्या पुतळ्याचं दहन करू, असा इशारा प्रहारचे सोलापूर शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिलाय.

बच्चू कडू यांच्याविरुद्ध गुन्हा

बच्चू कडू यांनी रवी राणांना आव्हान देताना एका बापाची औलाद असा उल्लेख केला. बच्चू कडू यांच्या या विधानावर महिला मुक्ती आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमरावती पोलिसांनी बच्चू कडू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in