Rss, भाजपचा स्वातंत्र्य लढ्यात काडीचा संबंध नव्हता, उद्धव ठाकरेंनी सुनावलं; राहुल गांधींवरही ताशेरे

वाचा सविस्तर बातमी काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
Rss, BJP had nothing to do with freedom Fight, Uddhav Thackeray said; Comments on Rahul Gandhi too in Saamana
Rss, BJP had nothing to do with freedom Fight, Uddhav Thackeray said; Comments on Rahul Gandhi too in Saamana Photos/India Today

वीर सावरकर यांचा सन्मान होईल असं एकही काम देवेंद्र फडणवीस किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने ही टीका केली आहे. उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली आहे. तसंच राहुल गांधींनाही खडे बोल सुनावण्यात आले आहेत. भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर टीका केली होती. त्यावरून सामनातून त्यांनाही सुनावण्यात आलं आहे.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचं सरकार आहे. मात्र वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेना करत असतानाही हे लोक बहिऱ्याची भूमिका वठवतात. यास ढोंग म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? वीर सावरकरांचा सन्मान होईल असंह एकही काम देवेंद्र फडणवीस आणि मोदी यांनी केलेलं नाही. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांच्या माफीचा विषय काढताच भाजपवाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात आणि फुत्कार सोडतात. पण ही संधी नागोबांना वारंवार राहुल गांधी का देतात हा संशोधनाचा विषय आहे. महाराष्ट्र वीर सावरकरांना मानतो, आदर करतो आणि त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो आणि यापुढेही करत राहिल असं सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

भाजप आणि मिंधे गटाचं सावरकर प्रेम अचानक उफाळून आलेलं

भाजप आणि त्यांच्या मिंधे गटाचं सावरकर प्रेम अचानक उफाळून आलं आहे. पण अशा प्रकारे उफाळण्याची संधी त्यांना राहुल गांधी यांनी दिली. राहुल गांधी यांनी हा सर्व प्रकार टाळला असता तर बरं झालं असतं. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांचं भव्य स्वागत झालं. जनतेचा उदंड प्रतिसादही मिळाला. हे सगळं व्यवस्थित सुरू असताना वीर सावरकरांचा विषय काढून भाजप आणि मिंधे गटाच्या हाती त्यांनी आयतं कोलीत द्यायची काहीही गरज नव्हती. त्यामुळे नकली हिंदुत्ववाद्यांना सावरकर प्रेमाचे आचकेउचके येऊ लागले. राहुल गांधींच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी मिंधे गटाचे काही लोक रस्त्यावर उतरले. मात्र पुण्यात या लोकांनी राहुल गांधी सोडून वीर सावरकरांच्याच प्रतिमेला जोडे मारल्याची छायाचित्रं समोर आली. वीर सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला त्याचा निषेध व्हायला हवा हे योग्य. पण निषेध करण्यासाठी ज्यांना रस्त्यावर उतरवले त्यांना राहुल गांधी आणि वीर सावरकर यांच्यातला फरकच समजत नाही.

वीर सावरकर हे अंदमानच्या काळ्या पाण्यातून इंग्रजांची माफी मागून सुटले की फ्रान्स येथे मारिया बोटीतून उडी मारून निसटले हा काही राहुल गांधी यांच्या भारत जोडोचा विषय नव्हता. देशात तीरस्कार निर्माण करणं, द्वेषाचं विष पसरवणं, महागाई, बेरोजगारी असे अनेक मुद्द्दे लोकांना जागं करण्यासाठी पुरेसे होते. वीर सावरकर यांचा विषय काढायची काहीही आवश्यकता नव्हती असंही सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा स्वातंत्र्यलढ्याशी काहीही संबंध नव्हता असंही अग्रलेखात म्हटलं गेलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in