''संजय राऊतांचे अभिनंदन कारण ते म्हणाले नाहीत शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा''

देशात सध्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन राजकारण सुरु झाले आहे. विरोधकांकडून सरकारच्या उमेदवाराला पाडण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.
Sanjay Raut | Sadabhau Khot
Sanjay Raut | Sadabhau Khot Mumbai Tak

सोलापूर: देशात सध्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन राजकारण सुरु झाले आहे. विरोधकांकडून सरकारच्या उमेदवाराला पाडण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. आज दिल्लीमध्ये सर्व विरोधी पक्षांची बैठक होत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने दिल्लीत बैठक पार पाडत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव विरोधी पक्षांकडून चर्चेत आहे. शिवसेना नेते संजय राऊतांनी शरद पवारांनी देशाचे राष्ट्रपती व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. आता त्याच मुद्द्यावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा असे संजय राऊत म्हणाले नाहीत म्हणून त्यांच अभिनंदन करेन कारण ते तेवढंच म्हणायचे राहिले आहेत असा टोमणा खोतांनी राऊतांना लगावला आहे. पवार साहेबांनी सांगितले की मी उमेदवार नाही. गावगाड्यात म्हण आहे की, ज्याचं त्याला कळेना आणि शेजाऱ्याला रात्रभर झोप येईना. त्यामुळे संजय राऊत रात्रभर जागलेत. त्यामुळे ज्याचे त्याला कळेल की काय करायचे. संजय राऊतांचे म्हणणे म्हणजे शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे आहे असेही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

''फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री होते''

सदाभाऊ खोतांनी यावेळी काल देहुमध्ये अजित पवारांबाबत घडलेल्या घटनेवर आपेल मत व्यक्त केले आहे. मला या लोकांचे हसू येते, काही घडले की महाराष्ट्राचा अपमान होतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? तुमची संपत्ती, तुमचा सातबारा महाराष्ट्राच्या नावावर करा बघू तुमची दानत आहे का?. मला वाटते महाराष्ट्राचा बिलकूल अपमान झालेला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते हे सुप्रिया ताई विसरलेल्या आहेत असा टोलाही सदाभाऊ खोतांनी लगावला आहे.

सुप्रिया ताईंनी तो शपथविधी आठवावा मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे झाले की नाही. प्रोटोकॉलप्रमाणे आधी मुख्यमंत्री बोलतात आणि मग उपमुख्यमंत्री त्यात वावगं काय? अजितदादा आणि देवेंद्रजी एकत्र तेव्हा महाराष्ट्रात त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून बघतो, असेही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

सदाभाऊ खोत हे शेतकरी नेते आहेत. राज्यात पाऊस सुरु झाला आहे. त्याचीच पाहणी करण्यासाठी सदाभाऊ दौऱ्यावर होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल म्हणाले ''काही भागात जूनचा पाऊस सुरु झालेला आहे. सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा आहे. खरीप हंगामात सुध्दा वादळीवारा आणि अचानक ढगफुटी सारखा झालेला पाऊस यामुळे केळीबागा आणि फळबागांचे नुकसान झाले आहे.

सकाळी सकाळी नाष्टा झाला की संजय राऊतांचे तोंड पाहावं लागते.

राज्याचा कृषीमंत्री कोण आहे हे समजत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीत असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. सकाळी सकाळी नाष्टा झाला की संजय राऊताचे तोंड बघायला लागते. संजय राऊताचे तोंड बघितले की दिवसभर काम होईना झालेय आणि सरकारला वेळ नाही. त्यामुळे या विनोदवीरांनी जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बांधावर गेले पाहिजे असेही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in