'मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती'; संभाजीराजे छत्रपतींची राज्यसभा निवडणुकीतून माघार

sambhajiRaje Chhatrapati : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत झालेल्या बैठकीतील चर्चेबद्दल संभाजीराजे छत्रपतींना केला गौप्यस्फोट
Sambhajiraje criticises Uddhav Thackeray over rajya sabha elections
Sambhajiraje criticises Uddhav Thackeray over rajya sabha elections

संभाजीराजे छत्रपती (sambhajiRaje Chhatrapati) यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत (Sambhaji Raje Press Conference) ही घोषणा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेबद्दल मोठा गौप्यस्फोट केला.

संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "मागील १५ ते २० वर्षांपासून मी घर सोडून काम करतोय. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कुणी मला राज्यसभेत पाठवलं, हे न पाहता समाजाची भूमिका प्रांजळपणाने मांडली. हे सगळं लक्षात घेऊन मी सर्वांना राज्यसभेत पाठवण्याचं आवाहन केलं होतं," असं संभाजीराजे म्हणाले.

"राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. मी मुंबईत आलो. मी जे बोलणार आहे, ते बोलण्याची इच्छा नाही. माझ्या तत्वात, स्वभावात, हे नाही. पण मला ते बोलायचं आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असो वा पुतळा. आपण दोघांनी तिथं जाऊ. शिवाजी महाराजांचं स्मरण करायचं आणि जर संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल, तर तुम्ही आधी सांगा," असं आव्हान संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

"मी जे बोलणार आहे, ते मला आवडत नाहीये, पण मला बोलावं लागत आहे. मुंबईत आल्यानंतर दोन खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठवले. आमची ऑबेरॉयमध्ये बैठक झाली. त्यांनी दोघांनी मला सांगितलं की, मी शिवसेनेत प्रवेश करावा, उद्याच तुमची उमेदवारी जाहीर करू. त्यावर मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार, शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही."

"त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी स्वतः मला फोन केला. मुख्यमंत्र्यांनी मला बैठकीसाठी निमंत्रित केलं. वर्षावर आलात, तर आपण चर्चा करू म्हणाले. मी सुद्धा मुख्यमंत्रीपदाचा मान ठेवत उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो. तीन मुद्दे तिथे चर्चिले गेले. त्यांनी मला सांगितलं की आम्हाला छत्रपतींना बाजूला ठेवायचं नाही, बरोबर हवेत."

"त्यांचा पहिला प्रस्ताव होता शिवसेना प्रवेशाचा. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट सांगितलं. मी त्यांच्या प्रस्तावाला नकार दिला. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की, शिवसेनेची ही जागा आहे, असं ते म्हणतात. शिवसेनेच्या माध्यमातून महाआघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मला करा. उद्धवजींनी विचार केला आणि त्यांनी सांगितलं की, हे शक्य होणार नाही," असं संभाजीराजेंनी बैठकीतील चर्चेबद्दल सांगितलं.

"त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना पुरस्कृत उमेदवार करायची आमची तयारी आहे. हे उद्धव ठाकरेंचं विधान आहे. तेही मी मान्य केलं नाही. त्यावर मी त्यांना दोन दिवस विचार करूयात असं सांगितलं. दोन दिवसांनंतर त्यांच्या मंत्र्यांचा मला फोन आला की, मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला सांगितलंय."

"सुवर्णमध्य काढून आम्हाला तुम्हाला उमेदवारी द्यायची आहे. मग आमची बैठक झाली. तिथून मी ऑबेरॉयला गेलो. मसुदा तयार झाला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि मी दिलेल्या सूचनातून मार्ग काढून मसुदा तयार केला गेला. तो मसुदा माझ्या मोबाईलमध्ये आहे. मंत्र्यांच्या हस्तक्षरात," अशी माहिती संभाजीराजेंनी दिली.

"ऑबेरॉयमध्ये भेटायला एक शिष्टमंडळ आलं. त्यामध्ये एक मंत्री होते. एक त्यांचे जवळचे स्नेही होते आणि एक खासदारही होते. त्यांच्या स्नेहींनी मला सुरूवातीलाच सांगितलं की, तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. मग मसुदा पुन्हा वाचू असं ते म्हणाले. मसुद्यातील एक शब्द बदलला. त्यानंतर सगळे निघून गेले. शब्द दिल्यानंतर मी कोल्हापूरला निघालो."

"कोल्हापूरला जातानाच बातम्या ऐकायला मिळाल्या की, वर्षावर शिवबंधन. संभाजीराजे प्रवेश करणार. कोल्हापूरला गेल्यानंतर समजलं की, माझाच कार्यकर्ता संजय पवार यांना उमेदवारी दिलीये. मी मसुद्यावेळी असणाऱ्या खासदारांना फोन केला आणि विचारलं हे काय चाललंय? तेही गप्प झाले. मंत्र्यांनाही फोन केला. तेही बोलले नाही. मुख्यमंत्र्यांनी फोन घेतला नाही," असं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.

"मला इतकं वाईट वाटतंय. मला मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांनी मला दिलेला शब्द मोडला. असो, स्वराज्य बांधण्यासाठी मी आता सज्ज झालोय. विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी सज्ज झालोय. २००९ ची निवडणूक हरल्यानंतर मी राज्य पिंजून काढला."

"माझ्या मनात कुणाबद्दलही द्वेष नाही. माझी स्पर्धा माझ्यासोबतच आहे. विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी उभा राहणार आहे. माझ्या अर्जावर सह्या करणाऱ्या आमदारांचे मी आभार मानतो. आयुष्यभर मी त्यांच्या पाठिशी राहणार आहे. केव्हाही हाक त्यांनी द्यावी, संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेसाठी हजर असेन," असं आश्वासन संभाजीराजेंनी दिलं.

"शिवसेनेनं मला ऑफर दिली होती. पक्ष प्रवेशाची. मी ती ऑफर घेऊ शकलो असतो, पण मी आधीच स्पष्ट केलं होतं. अनेक आमदारांचे फोन आहेत की, राजे कुठल्याही परिस्थिती निवडणूक लढवायचीच. पण, यात घोडेबाजार होणार याची कल्पना आहे. सगळ्या पक्षातील लोकांनी मला मदत करावी. निष्कलंक माझं व्यक्तिमत्व आहे. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी या निवडणुकीला सामोरा जाणार नाही. पण, ही माघार नाहीये, हा माझा स्वाभिमान आहे," असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in