
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमधील सुरतमध्ये असून, त्यांच्यासोबत काही आमदारही आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सरकारला धोका निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये जाण्यामागे वेगवेगळे तर्क लावले जात असून, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, "नक्कीच काही आमदार मुंबईत नाही. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क होत नाहीये, हे सत्य आहे. हे रात्री झालं. सकाळपासून काही आमदारांशी संपर्क झालाय. काही आमदारांना गैरसमजातून बाहेर नेण्यात आलंय. एकनाथ शिंदे मुंबईच्या बाहेर आहेत आणि त्यांच्याशीही संपर्क झालाय," अशी माहिती राऊत यांनी दिली.
"ज्या प्रकारचं चित्र निर्माण केलंय जातंय. भूकंप होईल. अन्य काही होईल. यात कसलंही तथ्य नाही. नक्कीच काही ठिकाणी, काही बाबतीत संशयास्पद वातावरण निर्माण झालंय. हे दूर होईल. आता आम्ही वर्षा बंगल्यावर जातोय. मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे," असं संजय राऊत म्हणाले.
"आज सकाळपासून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रात राजस्थान आणि मध्य प्रदेश पॅटर्नप्रमाणे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडावं, अशी हालचाल गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण मध्य प्रदेश पॅटर्न, राजस्थान पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. त्यांचे प्रयत्न नक्कीच सुरू आहेत. या पद्धतीने तुम्हाला किंगमेकर होता येणार नाही. या पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. या पद्धतीने महाराष्ट्रावर घाव घालता येणार नाही."
"शिवसेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्रावर घाव घालणं. मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आहेत मंगलप्रभात लोढा. त्यांनी मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा केली. त्यांची पावलं कोणत्या दिशेनं पडताहेत, तुम्ही समजून घ्या. यासाठी फाटाफूट घडवून आणता आहात का. मुंबईवर विजय मिळवण्यासाठी शिवसेनेला कमजोर केलं पाहिजे. शिवसेना दुबळी केली पाहिजे. हे फार मोठं कारस्थान, षडयंत्र आहे. तसं भाकित यापूर्वीच केलं होतं," असा आरोप राऊत यांनी भाजपवर केलाय.