मनसेचं भोंग्यांसाठीचं आंदोलन म्हणजे फक्त नौटंकी आणि फुसका बार-संजय राऊत

जाणून घ्या आणखी काय काय म्हणाले आहेत संजय राऊत?
मनसेचं भोंग्यांसाठीचं आंदोलन म्हणजे फक्त नौटंकी आणि फुसका बार-संजय राऊत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २ एप्रिलला मशिदींवरच्या भोंग्यांचा विषय भाषणात काढला होता. त्यानंतर १२ एप्रिललाही त्यांनी जी उत्तरसभा घेतली त्यात त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. ३ मे पर्यंत भोंगे उतरवा नाहीतर आम्हाला हनुमान चालीसा पठण करावं लागेल असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर महाराष्ट्राल्या हिंदू जनतेला उद्देशून त्यांनी एक पत्रही लिहिलं आहे त्यातही हिंदू बांधवांनी भोंग्याविरोधात एकत्र यावं आणि हा सामाजिक प्रश्न सोडवावा असं म्हटलं आहे. आज या आवाहानाला संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे. यावरूनच संजय राऊत यांनी मनसेवर टीका केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेफोटो-सौजन्य-MNS Adhikrut

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

"राज्यातल्या धार्मिक स्थळांवर कायदेशीररित्या लाऊडस्पीकर लावण्यात आहेत आणि भोंग्यांवरून आंदोलन करण्याची स्थिती नाही हे दिसून आलं आहे. मनसेचं आंदोलन कुठेही दिसलं नाही. त्यामुळे एक दिवसाची नौटंकी आणि फुसका बार आहे. जो विषय अस्तित्वातच नाही त्या विषयांवर कसं आंदोलन करत आहात? आंदोलन यशस्वी होण्यासाठी त आधी सुरू व्हावं लागतं" असं म्हणत संजय राऊत यांनी मनसेला टोले लगावले आहेत.

राज ठाकरे
राज ठाकरे(फोटो सौजन्य - ट्विटर)

राज ठाकरे यांनी पत्र लिहून जे आवाहन महाराष्ट्राला आणि देशाला केलं त्यानंतर आज ठाणे, नाशिक, जळगाव या ठिकाणी हनुमान चालीसा लावण्याचे प्रयत्न झाले मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचत संबंधितावर कारवाई केली. नासिक मध्ये ३३ मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच हनुमान चालीसा लावण्यासाठीची संमतीही देण्यात आलेली नाही. पोलीस त्यांच्या परीने बंदोबस्त राखत आहेत आणि अनुचित प्रकार घडणार नाही याचीही दक्षता पोलिसांनी घेतली आहे. मात्र या आंदोलनाची संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे.

१ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंनी जे भाषण केलं त्या भाषणातही त्यांनी ३ मे चा अल्टिमेटम दिला होता. आता आज राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी केलेलं भाषण चिथावणीखोर होतं असं सांगत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशात राज ठाकरे यांनी आजच आपली भूमिका स्पष्ट करणार हे सांगितलं होतं. ही भूमिका त्यांनी पत्राद्वारे मांडली आहे. या पत्राच्या तिसऱ्या पानावर त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की कै. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवारांचं ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊनच जाऊ दे.

देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावं. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या. असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सवाल विचारला आहे आणि बाळासाहेबांचं ऐकणार आहात की नाही याचा फैसला लावा असंही म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.