
काश्मिरातील पंडितांच्या हत्या आणि गुजरातमधील हार्दिक पटेल यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं. पंतप्रधान, गृहमंत्री फक्त राजकारण करत आहेत, हेच देशातील हिंदूंचं दुर्दैव आहे, असं विधान राऊतांनी केलं.
संजय राऊतांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. कश्मिरात दहशतवाद्यांकडून कश्मिरी पंडितांवर होत असलेले हल्ले आणि हत्यांवर त्यांनी सरकारला जबाबदार धरलं.
राऊत म्हणाले, "370 कलमाचा विषय नाही. जम्मू कश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्याचाही काही फरक पडलेला नाही. कश्मिरी पंडित रस्त्यावर उतरलेत. सामुदायिक स्थलांतर करण्याबद्दल त्यांनी सरकारला सूचना दिलीये. केंद्रातलं सरकार हे प्रखर हिंदुत्ववादी, प्रखर राष्ट्रवादी, कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबद्दल आग्रही असलेलं सरकार आहे."
"नोटबंदीनंतर कश्मिरातील दहशतवाद संपुर्णपणे संपेल, असं वचन देणार सरकार आज कश्मीरमध्ये जवान, पोलीस अधिकारी, कश्मिरी पंडित, मुस्लीम अधिकारी मारले जाताहेत त्यांचं रक्षण करू शकत नाही. कारण पंतप्रधान, गृहमंत्री फक्त निवडणुका आणि राजकारण यामध्ये गुंतून पडले आहेत," अशी टीका राऊतांनी केली.
"त्यांनी (नरेंद्र मोदी, अमित शाह) देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे, कश्मीरमधील सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं आहे. दुर्दैवानं फक्त राजकारण, विरोधकांवर हल्ले, ईडी-सीबीआय सारख्या संस्थांचा दुरुपयोग याच्यात गुंतलेल्या सरकारला कश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही. हे या देशाचं आणि देशातील हिंदूंचं दुर्दैव आहे," असं राऊत म्हणाले.
राऊतांचं दानवेंना उत्तर...
बाबरी पाडली गेली, त्यावेळी दुर्बिणीने शोधून देखील शिवसैनिक सापडला नाही, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे शिवसेनेवर टीका करताना म्हणाले होते. दानवे यांच्या या विधानाला उत्तर देताना राऊत म्हणाले, "अच्छा! दुर्बिणीने ते काय काय बघतात पहावं लागेल. त्यांच्याकडे दुर्बिणीनी लावल्या म्हणूनच ते बाबरी पडत असताना पळून गेले आणि शिवसैनिकांनी पाडली, असं सत्य कथन भाजप नेत्यांच्या तोंडून बाहेर पडलं. पळपुट्ट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये."
"भाजपने त्यांच्याबद्दल देशद्रोही शब्दाची व्याख्या केली होती. ती काय होती, त्यांनी भूमिका तपासली पाहिजे. अर्थात असे मासे गळाला लागत असतात. खोट्या केसेस, सत्तेचा गैरवापर. यामाध्यमातून दबाब आणला जातो. हार्दिक पटेलही त्याच एका यंत्रणेचा बळी आहेत," असं गंभीर विधान राऊतांनी केलं.