
मुंबई: येत्या २१ जुलैला देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. त्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे नाव या निवडणुकांसाठी चर्चेत आहेत. महाराष्ट्र काँग्रेस, शिवसेना सारख्या पक्षांनी शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देखील जाहीर केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही शरद पवार या देशाचे राष्ट्रपती व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. आणि शरद पवारांचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदीही मान्य करतील असे ते म्हणाले.
संजय राऊत बोलताना म्हणाले " शरद पवारांना विरोधी पक्षांचे नेतृत्वही करावे आणि राष्ट्रपतीपदासाठीही ते योग्य आहेत. दोन्ही पदासाठी शरद पवारांची जास्त गरज आहे. भाजपला हरवण्यासाठी ज्यावेळी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याची वेळ येते तेव्हा शरद पवारांचे नाव पहिले घेतेले जाते. देशाला जर राष्ट्रपती हवा असेल शरद पवार आहेत आणि रबर स्टॅम्प हवा असेल तर अनेक जण आहेत. देशाला जर अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी यांच्यासारखे राष्ट्रपती हवे असतील तर शरद पवारांचे नाव पहिले येते. आणि त्यांचे नाव मोदीही मान्य करतील.''
शरद पवारांनी आपले नाव राष्ट्रपतीपदासाठी नाही हे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत शरद पवारांनी आपल्या नेत्यांना सांगितले आहे की त्यांचे नाव विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून नाही. संजय राऊतांनी याला बळकटी दिली आहे. राऊतांनी सांगितले की मी जेव्हा शरद पवारांना राष्ट्रपतीपदासाठी इच्छूक आहात का? असे विचारले तेव्हा ते इच्छूक दिसले नाहीत.
येत्या १५ तारखेला दिल्लीमध्ये देशातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही अशा राज्यांच्या प्रतिनिधींना त्या बैठकीसाठी आमंत्रीत करण्यात आले आहे. त्या बैठकीला शिवसेनेचाही मुख्यमंत्री जाणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि प्रफ्फुल पटेल जाणार आहेत.