
औरंगाबाद: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी येत्या १० तारखेला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सात जागांसाठी मतदान आहे, यासाठी सात उमेदवार मैदानात आहेत. भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात सहाव्या जागेसाठी चुरस असणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनाही विजयाची आशा आहे. आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. यातच शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठे विधान केले आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे हे महाविकास आघाडीलाच मतदान करतील असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला आहे. संतोष दानवे यांचे मत माझ्या घरातलेच आहे, ते मी फोडणारच, असा विश्वास देखील सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
अब्दुल सत्तार यांच्या दाव्याने आता गोटात उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. आमचेकडे पुरेसे मतदान आहे आमचाच उमेदवार निवडूण येणार असे भाजपचे नेते वारंवार बोलत आहेत. परंतु महाविकास आघाडीने सर्व आमदारांना एकत्र बोलावून पुन्हा आपण एकत्र असल्याचे दाखवून दिले आहे.
छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष आमदारांची मनधरणी दोन्ही पक्षांकडून सुरु आहे. अशा वेळी सत्तारांनी थेट भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलालाच आपल्या गळाला लावल्याचा दावा केला आहे. संतोष दानवे महाविकास आघाडीलाच मतदान करतील असा विश्वास सत्तारांना आहे.