महाबळेश्वरमधील निजामच्या संपत्तीवर 'सर्जिकल स्ट्राईक' : जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

प्रतापगडपाठोपाठ आणखी जिल्हाधिकाऱ्यांची आणखी एक धडक कारवाई
Mahabaleshwar
MahabaleshwarMumbai Tak

सातारा (इम्तियाज मुजावर) : महाबळेश्वर येथील निझामांचा भाडेतत्वावरील 15 एकर 15 गुंठे भूखंड आणि त्यावरील वुडलाॅन हा अलिशान बंगला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशाने सील करण्यात आला आहे. तहसिलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने ही धाडसी कारवाई करत मुख्य बंगला आणि आजूबाजूच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या. बाजार भावाप्रमाणे या मिळकतीची किंमत 200 ते 250 कोटी रुपयांच्या घरात आहे.

यापूर्वी 1 डिसेंबरला ही मिळकत ताब्यात घेण्यासाठी आलेल्या 60 ते 70 लोकांच्या जमावामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. याआधीही अनेक वेळा मिळकत ताब्यात घेण्यावरून 2 गडांमध्ये राडे झाले आहेत. ही बाब लक्षात घेवुन सातारचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी 2 डिसेंबरला तहसिलदार सुषमा चैधरी पाटील यांना वुडलाॅन ही मिळकत ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसिलदारांनी 2 डिसेंबरला मिळकत ताब्यात घेण्याची तयारी केली. मात्र पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने तहसिलदारांनी 3 तारखेला कारवाईचा निर्णय घेतला. तहसिलदारांच्या मागणीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनीही अतिरिक्त कुमक पाठविली, त्याचप्रमाणे मदतीसाठी वाईचे तहसिलदार रणजितसिंह भोसले यांनाही पाठविले.

सकाळी 10 वाजता तहसिलदार सुषमा चौधरी आणि त्यांची कुमक वुडलॉन बंगल्यावर दाखल झाली. येथील मुख्य बंगल्या शेजारीच्या स्टाफ क्वार्टरमध्ये अनेक वर्षे माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे आणि त्यांचे पती माजी नगरसेवक कुमार शिंदे राहत आहेत. त्यांना शासकीय कारवाईची माहिती देवून सर्व साहित्य बाहेर घेऊन बंगला सोडण्यास सांगितले. आदेशाप्रमाणे शिंदेंनीही संध्याकाळी 5 पर्यंत बंगला रिकामा केला.

यानंतर तहसिलदारांसमक्ष मुख्य बंगल्याच्या सर्व खोल्यांना, निझामांच्या स्टाफ क्वार्टरला आणि दोन्ही गेटला सील केलं. तसंच कोणत्याही खाजगी व्यक्तीला प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली.

काय आहे या संपत्तीचा इतिहास?

ब्रिटीशांनी हा भुखंड भाडेपट्ट्याने पारशी वकील यांना दिला होता. स्वातंत्र्यानंतर 1952 साली हिज हायनेस नबाब मीरसाब उस्मान अल्लीखान बहादुर नबाब ऑफ हैद्राबाद यांच्या नावे करण्यात आला. नबाब यांच्याकडे आयकराची मोठी थकबाकी होती. 59 लाख 47 हजार 797 रूपयांच्या आयकर वसुलीसाठी टॅक्स रिकव्हरी ऑफिसर कोल्हापूर यांच्याकडील पत्रांनुसार थकबाकीची नोंद मिळकत कार्डावर करण्यात आली आणि जोपर्यंत ही वसुली होत नाही तो पर्यंत ही मिळकत विक्री करणे, गहाण ठेवणे आणि कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली.

हैद्राबाद येथील नबाबांचे वारस म्हणून नबाब मीर बरकत अल्लीखान बहादुर यांचे नाव लावण्यात आले. 2003 साली पुन्हा ही मिळकत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व पट्टेदारांची नावं वगळून मिळकत शासनजमा केली. 2005 साली पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश मागे घेवून पूर्वीप्रमाणे परिस्थिती कायम करण्यात आली.

2016 साली या मिळकतीचे हस्तांतरण झाले आणि मिळकतीवर डायरेक्टर हर्बल हाॅटेल प्रा. लि. तर्फे दिलीप ठक्कर यांचे नाव लावण्यात आले. तेव्हा पासुन ही मिळकत वादात अडकली होती. ठक्कर आणि नबाब यांच्यात मिळकतीवरून वाद सुरू झाला, तसंच वारंवार मिळकत ताब्यात घेण्याचेही प्रयत्न झाले.

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अफजलखान थडगे परिसरात अतिक्रमणावर धाडसी कारवाई करून भूखंड मोकळा केला होता. त्यानंतर आज पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तहसिलदार यांनी धाडसी कारवाई करून 200 ते 250 कोटी रूपये किंमतीचा भुखंड ताब्यात घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in