
मुंबई: 'आरोग्याचा विषय हा नाजूक असतो. त्यातही सीरियस आरोग्याचा विषय असेल तर त्याबाबत कोणीही तडजोड केली नाही पाहिजे. पण तरी सुद्धा निवडणुकीसाठी आणि मतदानासाठी जर एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असेल तर त्यावरुन समजून घ्या की, भाजप किती टेन्शनमध्ये आहे.' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. 'मुंबई Tak'शी बोलताना रोहित पवारांनी असाही विश्वास व्यक्त केला की, या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होईल.
पाहा रोहित पवार नेमकं काय म्हणाले:
'गेले 3 तास मी आत बसलो होतो. मी सुरुवातीच्या सत्रात मतदान केलं. पहिल्या 10 मध्येच मतदान करण्याची संधी मला मिळाली आणि त्यानंतर मी ऑफिसमध्ये आमदारांसोबत मी बसलो होतो. नाष्टा चालू होता. मग काँग्रेसचे काही लोकं आले आपली लोकं त्यांच्याकडे गेले मग शिवसेनेचे आले. त्यानंतर त्यांच्या आणि आमच्या नेत्यांमध्ये चर्चा ही सातत्याने त्याठिकाणी सुरु होती.'
'यानंतर आमच्या सर्व नेत्यांमध्ये खेळीमेळीचं वातावरण आहे. त्यामुळे टीव्हीवर जे वातावरण दिसतं आहे आणि जे भाजप कदाचित वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतंय की, अतिशय टेन्शन आहे वैगरे.. पण तसं काही नाही. एकदम निवांत सगळं सुरु आहे. विश्वासाने मतदान झालं आहे.' असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
'समजा, सर्व पक्षाच्या नेत्यांनी एक रणनिती ठरवलेली असेल की, कुठे तरी आपण पहिले राष्ट्रवादीचे संपू द्या मग काँग्रेसचे संपू द्या आणि मग त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार मतदान करतील. त्यामुळे रणनिती प्रमाणे आम्ही चाललो आहोत. गणितीची देखील एक रणनिती असते. त्यामुळे कोणी किती देखील सांगितलं 44 मतं वैगरे हे खरं नसतं. कारण कोणाला किती कसं मतदान झालं आहे याचा अंदाज आपल्याला त्याठिकाणी काही प्रमाणात येतो.' असं रोहित पवार यांनी सांगितलं
'पहिल्या पसंतीचं कोणाला दिलंय, दुसऱ्या पसंतीचं कोणाला दिलंय याचं एक गणित असतं. हे सगळं गणित पाहत असताना हे ज्या काही पुड्या सोडल्या जात आहे भाजपकडून त्या खोट्या आहेत असं आमचं मत आहे.' असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.
'अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत. त्यांच्या मतदारसंघातील कामं जर सुरळीत पद्धतीने पार पडत असतील थोडेफार मतभेद असू शकतात. ते कोणामध्ये नसतात. नवरा-बायकोमध्ये असतात. पण कोणतेही मोठे मतभेद नसून उलट भाजपचे जे 6 अपक्ष आमदार त्यांच्याबरोबर आहेत हे त्यांना मतदान करतात की नाही हाच खरा प्रश्न आहे.' असा टोला रोहित पवार यांनी भाजपला लगावला आहे.
'शरद पवार हे कोणतीही निवडणूक झाली की त्यांच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या कामाला सुरुवात करतात. त्यांचं जसं वेळापत्रक ठरलेलं असतं तसं ते काम करतात. ते टेन्शन विरोधकाला देत असतात. ते स्वत: कधी टेन्शन घेत नाहीत. त्यामुळे ते त्यांच्या ठरलेल्या कामासाठी निघून गेले आहे. कारण सत्तेत आमचे जे नेते आहेत त्यांच्यावर पवार साहेबांचा पूर्ण विश्वास आहे.' असं स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिलं आहे.
'भाजप नेते टेन्शनमध्ये नसते तर त्यांच्यातील काही जणं अतिशय आजारी आहेत अशा परिस्थितीत खूप आजारी असताना देखील जर त्यांना मतदानाला या ठिकाणी आणलं जात असेल तर टेन्शन कोणी घेतलंय हे आपण कुठे तरी समजून घेतलं पाहिजे. आरोग्याचा विषय हा नाजूक असतो. त्यातही सीरियस आरोग्याचा विषय असेल तर त्याबाबत कोणीही तडजोड केली नाही पाहिजे. पण तरी सुद्धा निवडणुकीसाठी आणि मतदानासाठी जर एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असेल तर त्यावरुन समजून घ्या की, भाजप किती टेन्शनमध्ये आहे.' अशी टीका करत रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.