'कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता, मात्र असं घडलं'; शरद पवारांचा मोदी सरकारला अप्रत्यक्ष इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार राज्यातील सत्तांतर, मोदी सरकार, भाजपबद्दल काय म्हणाले?
sharad Pawar hits out at modi govt over misuse of central agencies
sharad Pawar hits out at modi govt over misuse of central agencies

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसत आहे. विरोधी बाकांवर आल्यापासून राष्ट्रवादीमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. पक्षाने आज राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी देशातील आणि राज्यातील राजकीय घटनांचा उल्लेख करत मोदी सरकार आणि भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीत राज्यातील आणि देशातील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या बैठकीत बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय इतिहास उलगडून सांगितल. कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.

शरद पवार नेमकं काय म्हणाले? भाषणातील ठळक मुद्दे...

"या बैठकीच्या अनुषंगाने तीन गोष्टी माझ्या मनात होत्या. एक म्हणजे पक्ष संघटना म्हणून पुढील अडीच वर्षात आपल्याला कष्ट करायचे आहेत. मी आताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगत होतो की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आपण १९९९ साली केली. आज २३ वर्षांचा कालखंड झालेला आहे," शरद पवार यांनी सांगितलं.

"या २३ वर्षात साडे सतरा वर्षे राज्यात सत्तेत होतो. भाजप स्थापनेपासूनचा कालखंड पाहिला तर सव्वा पाच वर्षांचा सत्तेचा कालखंड आहे. त्यामुळे सत्ता नसली तरी चिंता करण्याची गरज नाही. माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की, सत्ता नसलेला काळ हा समाधान देणारा असतो," असं शरद पवार पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाले.

"सत्तेत असताना आपण अनेक निर्णय घेतो, धोरणं आखतो. त्याची माहिती घेण्याची साधने काय? तर तालुका स्तरावरील अधिकारी जिल्हा, राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांपर्यंत अहवाल पाठवतात. तो शंभर टक्के खरा असतो असे नाही. पण सत्ता नसताना थेट लोकांमध्ये जाता येतं."

शरद पवार ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले?

"दौरे करताना अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात, त्यातून अनेक प्रश्न समजतात. दुसरी गोष्ट अशी की, सत्ता नसताना पक्ष संघटना अधिक प्रभावी करता येते. आपण सत्तेत नसताना आज एकत्र आलेलो आहोत. पक्ष संघटना आणखी कशी वाढवायची यासंबंधीची चर्चा करायची होती. अनेक सदस्यांनी याबाबत आपले मत मांडले," असं शरद पवार बैठकीत म्हणाले.

"निवडणुकांचा उल्लेख काहींनी केला. सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरु आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात, असे वक्तव्य केले आहे. ओबीसींना घेऊनच निवडणुका झाल्या पाहीजेत, हा आपला दृष्टीकोन आहे. ओबीसींना बाजूला ठेवून निवडणुका होता कामा नयेत," अशी भूमिका शरद पवार यांनी बैठकीत मांडली.

"यानिमित्ताने नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची जबरदस्त शक्ती उभी करण्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. या निवडणुकांमध्ये नेतृत्वाची नवी पिढी तयार करण्याची, तसेच समाजातील सर्व घटकांना आणि तरुणांना संधी कशी देता येईल, याचीही काळजी आपल्याला घ्यायची आहे."

शिवसेनेतील बंडखोरीवरून केंद्र सरकारवर पवारांची टीका

"वरिष्ठ नेते सूचना देतील त्याप्रमाणे जिल्हास्तरावर तरुणांना, लहान घटकांना संधी देण्याचा प्रयत्न करा. पन्नास टक्क्यांच्या आसपास तरुण आणि इतर घटकांना संधी दिल्यास, राज्यात नवीन नेतृत्वाची फळी तयार होईल. त्यामाध्यमातून लोकांच्या कामांना न्याय देता येतो."

"संसदीय लोकशाहीवर हल्ला करणे हे सध्या भाजपचे सूत्र दिसत आहे. कर्नाटकमध्ये त्यांचे राज्य नव्हते. काँग्रेसची माणसं फोडून तिथे सत्ता हस्तगत केली. मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसचे सरकार होते. त्याठिकाणीही फोडाफोडी करुन राज्य हातात घेतले. महाराष्ट्रात काय झाले, हे सर्वांनाच माहीत आहे," असं शरद पवार राज्यात झालेल्या सत्तांतराबद्दल म्हणाले.

"या सगळ्याचा उद्देश काय? तर लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर आलेल्या लोकांना सत्तेपासून बाजूला करणे. सत्ता आपल्याच हातात केंद्रीत होईल, याची काळजी घेणे. सत्ता विकेंद्रीत झाली पाहीजे. मात्र आज केंद्रातील सरकार सबंध देशातील सत्ता केंद्रीत करत आहे."

इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीबद्दल पवार काय म्हणाले?

"ही केंद्रीत झालेली सत्ता एक विशिष्ट विचारसरणी रुजविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय. सत्तेचा गैरवापर करुन एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा आरोप शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला.

"१९७५ साली मी राज्य मंत्रिमंडळात काम करत होतो त्यावेळेस इंदिरा गांधींनी आणीबाणीचा निकाल दिला. आम्ही तरुण आमदार तेव्हा नाराज होतो, आमची नाराजी देखील व्यक्त केली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आणीबाणी झाल्यावर सुरुवातीला लोक चांगलं बोलले. पण ती सत्ता केंद्रीत झाली होती."

शरद पवारांचा मोदी सरकार आणि भाजपला इशारा

"केंद्रीत सत्ता भ्रष्ट व्हायला लागते. हजारो लोकांनी याविरोधात भाषणे केली आणि लोकांनी ती सत्ता उखडून टाकली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा अनेक ठिकाणी पराभव झाला. जनता पक्षाचे सरकार आले आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता, मात्र असे घडले."

"लोकशाहीमध्ये तुम्ही आणि मी यापेक्षा सामान्य लोक अधिक हुशार असतात. आपल्याकडे बघणारे हजारो लोक असतात. ते लोक बोलत नाहीत. पण मतदानाची संधी मिळाल्यावर ते निर्णय घेतात. १९७७ साली ज्यांना राज्य मिळालं, त्यांना ते चालवता आलं नाही. मग पुन्हा लोकांनी इंदिरा गांधींच्या हातात सत्ता दिली."

"याचा अर्थ लोक बघत असतात, निरीक्षण करतात आणि राजकारण्यांनाही जनता योग्य रस्त्यावर आणते. आज केंद्रीय सत्ता जरी ठिकठिकाणचे राज्य बरखास्त करण्याचे काम करत असली तरी आज ना उद्या सामान्य जनता याचा निकाल घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्या सर्वांची तयारी असली पाहिजे."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in