Advertisement

शेअर बाजार ते पोलिस अकादमी : राष्ट्रवादीने दिली गुजरातला गेलेल्या प्रकल्पांची यादी

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे वळवण्याचं कारस्थान हे हिमनगाचं फक्त वरचं टोक
NCP Tweet
NCP Tweet Mumbai Tak

मुंबई : महाराष्ट्रात तळेगावमधील प्रस्तावित वेदांता-फॉक्सकॉन यांचा सेमीकंडक्टर प्रकल्प आता गुजरातमध्ये गेला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीचे नेते विरूद्ध शिंदे फडणवीस सरकार असा सामना रंगतो आहे. मागील 3 महिन्यांमध्ये काहीच प्रयत्न न झाल्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असा आरोप शिंदे सरकारवर करण्यात येत आहे, तर यावर शिंदे सरकरामधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे वळवण्याचं कारस्थान हे हिमनगाचं फक्त वरचं टोक आहे, अशी टीका केली आहे. महाराष्ट्रात सत्तापालट घडवून वेदांत - फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे वळवण्याचं कारस्थान हे हिमनगाचं फक्त वरचं टोक आहे. बुलेट ट्रेनने हा रोख आधीच स्पष्ट केलाय. शेअर बाजारापासून ते औद्योगिक केंद्रापर्यंत सगळं गुजरातला नेऊन मुंबईची व्यापारी राजधानी ही ओळख पुसण्याचे हे कुटील उद्योग आहेत. पुढच्या टप्प्यात मुंबई केंद्रशासित करून विदर्भही तोडला जाईल. मग भाजपावाले शिल्लक महाराष्ट्राचे आणखी लचके तोडायला मोकळे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

शिवाय गुजरातच्या नकाशामध्ये यापूर्वी महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या विविध प्रकल्पांची यादी ट्विट केली आहे. यात आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुंबई मुख्यालय, केंद्रीय यंत्रणांचे कार्यालय, एनएसजी, मरिन पोलिस अॅकडमी, हिरे मार्केट, बुलेट ट्रेन अशा विविध प्रकल्पांचा समावेश असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केले आहे.

अनिल अग्रवाल यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

गुजरातमध्ये गेलेला प्रकल्प १.५४ लाख कोटी रूपयांचा आहे. या प्रकल्पामुळे एक लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. वेदांता फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी मेड इन इंडिया सेमीकंडक्टर निर्मितीमुळे किंमतीत मोठी घसरण होऊ शकते असंही सांगितलं आहे. तसंच या प्रकल्पासाठी त्यांनी भारताचे आभार व्यक्त केले आहेत.

भारतात तयार होणाऱ्या सेमीकंडक्टर चीपमुळे लॅपटॉपच्या किंमतीत मोठी घट होणार आहे. या सेमीकंडक्टरमुळे एक लाख रूपयांचा लॅपटॉप ४० हजारांपर्यंत किंवा त्यापेक्षाही कमी किंमतीत मिळू शकतो. सेमीकंडक्टर प्रोजेक्ट सध्या तैवान आणि कोरियात आहे. लवकरच हा प्रोजेक्ट भारतात सुरू होईल असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in