
दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असं म्हटलं जातं. मात्र महाराष्ट्रात दसरा वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. शिवसेनेत जी उभी फूट पडली आहे त्या कारणामुळे दसरा आणि दसरा मेळावा याची चर्चा होते आहे. यावर्षी शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा मेळावा पार पडणार आहे. तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मेळावा पार पडणार आहे. आपलाच दसरा मेळावा कसा बरोबर आहे हे सांगण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत आहेत. आता शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना त्यांच्याच काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी वक्तव्यांची आठवण करून देत विसर न व्हावा कँपेन सुरू केलं आहे.
दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजतले आणि त्यांच्या भाषणातले अंश वापरत एकनाथ शिंदे गटाने आम्ही विचारांचे वारसदार हे वाक्य निवडलं आहे. याच अनुषंगाने सोशल मीडियावर विसर न व्हावा हे कँपेन सुरू करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातच अजित पवार, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यावर टीका केली होती हे सांगणारी ही वक्तव्यं आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ही सगळी वक्तव्यं ट्विट केली आहेत. ही वक्तव्यं उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचीच आहेत. ती क्लिप चालल्यानंतर पुढे विसर न व्हावा या ओळी येतात आणि निष्ठा विचारांशी आणि लाचारांशी नाही असंही वाक्य दिसतं.
३५ वर्षांनंतर शरद पवारांना शेतकऱ्यांची आठवण आली आहे. शरद पवारांना विनंती आहे धरणाच्या आसपास जाणार असाल तर अजित पवारांना घेऊन जाऊ नका.
ज्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती तोडेल तेव्हा काँग्रेसवाले यांच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा लावतील आणि यांना तुरुंगात टाकतील
आता निवडणुका आल्या की यांच्या अंगात देव घुमायला लागतील सोनिया गांधी येतील, शरद पवार येतील सगळे सगळे येतील. जात्यांध शक्ती, धर्मांध शक्ती कोण आहेत या शक्ती?
पहिले एक ठरवा की तुमचा नेता कोण असणार शरद पवार असणार की ज्यांच्यामुळे शरद पवारांनी काँग्रेस सोडली त्या सोनिया गांधी असणार? पुन्हा भांडून थकून जाल. आता आणखी थकवा नको.
सुशील कुमार शिंदे म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता थकून गेले आहेत. काय करून एवढं थकलात? 50-60 वर्षे खा खा खाल्लं. खाऊन खाऊन थकलात का तुम्ही?
अजित पवार आज तुमच्या डोळ्यात पाणी येतंय, पण जेव्हा माझा हा शेतकरी डोळ्यात पाणी आणून तुमच्या दारात आला होता की धरणात पाणी नाही तेव्हा काय तुमचे शब्द होते? काय पाणी दाखवलं होतं ते विसरू नका. तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
सामनाचा अग्रलेख काढला आणि गुन्हा दाखल केला. कोण होतं मुख्यमंत्री कोण होतं उपमुख्यमंत्री? कुठे होते शरद पवार?
आम्ही भाजपला पाठिंबा देणार नाही तर ३७० कलम काढू नका म्हणणाऱ्या कर्मदरिद्री काँग्रेसला द्यायचा का? देशद्रोह्याचा खटला काढू म्हणणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा का?
आपली जी काही ताकद आहे ती आपण काँग्रेसच्या मागे कधीही उभी राहू देणार नाही. भगव्याशी युती करून मजबूत सरकार का आणायचं नाही? जे आपण आणलं?
शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी जशी जय्यत तयारी केली आहे तशीच तयारी सोशल मीडियावरही केलेली दिसून येते आहे. या सगळ्या ट्विटमधून उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यात आलं आहे. आता उद्धव ठाकरे याबाबत बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.