'लिहून ठेवा, हे सरकार मुडद्याप्रमाणे वाहून जाईल'; मोदी सरकारवर शिवसेना का संतापली?

Shiv sena Vs Modi Govt : शिवसेनेकडून सोमय्यांचा विझलेला बोबडा फटाका असा उल्लेख
'लिहून ठेवा, हे सरकार मुडद्याप्रमाणे वाहून जाईल'; मोदी सरकारवर शिवसेना का संतापली?
भाजप नेते किरीट सोमय्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना नेते संजय राऊत.

अनिल परब (Anil Parab) यांच्या निवासस्थानी झालेल्या झाडाझडतीनंतर शिवसेनेकडून (Shiv sena) संतप्त प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) महाराष्ट्रात (Maharashtra) सुरू असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या (central agencies) कारवायांवरून मोदी सरकार (Modi Govt) आणि भाजपवर (BJP) टीकेचे बाण डागले आहेत. विझलेला बोबडा फटाका म्हणत शिवसेनेनं सोमय्यांनाही (Kirit Somaiya) डिवचलं आहे.

शिवसेनेनं म्हटलं आहे की, "आपल्या देशातील तपास यंत्रणा व न्यायव्यवस्थेवर जागतिक पातळीवर संशोधन करावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. रोजच्या रोज ‘ऐकावे ते नवलच!’ अशी इसापछाप प्रकरणे समोर येत आहेत. राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरी व मित्रपरिवाराकडे गुरुवारी सकाळपासून ‘ईडी’ नामक केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी छापेमारीच्या नावाखाली गेले. त्यांनी म्हणे परबांची 12 तास चौकशी केली.'

"गेले काही दिवस, नव्हे काही महिने दापोलीतील साई रिसॉर्टशी परबांचे नाव जोडले गेले. परब यांचा कागदोपत्री पक्क्या पुराव्यांसह दावा आहे की, संबंधित रिसॉर्टशी त्यांचा संबंध नाही. तरीही त्याविषयी ईडी, केंद्रीय पर्यावरण खात्याकडून अनेक बाबतीत नियमभंग झाल्याचा बोभाटा करून परबांना ‘टार्गेट’ केले जात आहे हे आता स्पष्टच दिसते," असा दावा शिवसेनेनं केला आहे.

"रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात गेले यावर संशोधन करून ईडीने छापे मारले हे नवलच आहे. प्रश्न पर्यावरण किंवा सांडपाण्याच्या बेकायदेशीर निचऱयाचाच असेल तर ईडीने त्यांची विशेष शाखा गंगा-यमुनेच्या किनारी निर्माण करायला हवी. कोविड काळात गंगेत सांडपाणी नाही, तर सडकी प्रेते हजारोंनी वाहत होती. त्यामुळे मानवी जिवांचा आणि गंगेच्या पर्यावरणाचा प्रचंड नाश झाला. दापोलीतील रिसॉर्टच्या सांडपाण्यापेक्षा गंगेचे पूर्ण सांडपाणी त्या काळात झाले हा गंभीर गुन्हा पर्यावरणवादी ईडी किंवा सीबीआयच्या नजरेस येऊ नये हे आक्रितच म्हणावे लागेल."

"भाजपचा एक बोबडा विझलेला फटाका ईडी, सीबीआयच्या नावे धमक्या देतो व त्याबरहुकूम कारवाया घडतात. आज याच्यावर छापे पडतील. उद्या त्याच्यावर धाडी पडतील. परवा त्यास तुरुंगात जावे लागेल, असे इशारे दिले गेले व केंद्रीय यंत्रणांची विश्वासार्हता कमी करण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे विद्यमान भाजप सरकारच्या हातातले कळसूत्री बाहुलेच बनले की काय?," असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

"या यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर छापे, धाडी, अटका अशा कारवाया करीत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे पोलीस ज्या भाजपच्या लफंग्यांवर चोरी, देशद्रोह, भ्रष्टाचार, लूटमार अशा गुन्ह्यांवर कारवाया करीत आहेत, त्या एकजात सगळ्यांवर जणू न्यायव्यवस्था ‘मेहरबान’ होऊन दिलासे देत आहे."

"देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास मींरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल केला. सध्या तरी प्रकरण आठ-दहा कोटींचे आहे, पण भ्रष्ट व अवैध मार्गाने जमिनी ताब्यात घेऊन त्यावर एक सप्ततारांकित क्लब या महाशयांनी उभा केला व त्यात भाजपच्या बड्या नेत्यांची भागीदारी (अर्थात छुपी) असल्याचे बोलले जाते. तो सगळा विषय बाहेर येतच आहे, पण भ्रष्टाचारविरोधी गुन्हा दाखल होताच हे नरेंद्र मेहता त्यांच्या पत्नीसह ‘फरार’ झाले व आता म्हणे त्यांना मुंबईच्या हायकोर्टाने अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे," असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा न्यायालयाच्या निर्णयावर भूमिका मांडली आहे.

"विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचा न्यायव्यवस्थेत भरणा होत आहे असा एक आरोप केला जातो. त्याच विचारसरणीच्या लोकांसमोर हे ‘दिलासा’ खटले चालवून हवे तसे निकाल घेतले जात असल्याची कुजबुज आज देशभरात सुरू आहे. हे सत्य असेल तर देशाच्या न्यायव्यवस्थेचा स्तंभही वाळवीने पोखरला गेलाय असेच म्हणावे लागेल," असा गंभीर आरोप शिवसेनेनं केला आहे.

"ईडी, सीबीआयचे महाराष्ट्रासारख्या राज्यांतील छापे हा आता गमतीचा विषय बनला आहे. समुद्रात सांडपाणी सोडले या सबबीखाली देशातील आर्थिक घोटाळ्यांचा तपास करणारी ईडीसारखी यंत्रणा छापेमारी करते. पंतप्रधान मोदी यांनी विशेष लक्ष घालावे असे हे प्रकरण आहे. याला राज्य चालवणे असे म्हणत नाही."

"अनिल देशमुख यांच्यावर दोनशेच्या वर छापेमारी करून काय मिळवले? नवाब मलिक यांच्या बाबतीतही ‘वडाची साल पिंपळाला’ चिकटवण्याचेच काम सुरू आहे. परबांचे ‘सांडपाणी’ हे तर वेगळेच प्रकरण आहे. हे असेच चालू राहिले तर गंगेत प्रेते वाहून गेली तसे हे सरकार मुडद्याप्रमाणे वाहून जाईल. चंद्रकांत पाटलांच्या भाषेत ‘मसणात जाईल’, हे लिहून ठेवा," असा इशारा शिवसेनेनं मोदी सरकारला दिला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in